ठाणे :हवामान विभागाने ठाणे जिल्ह्याला २७ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार गुरूवारी २४ तास मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे नदी, खाडी, तसेच शहरातील सखल भाग जलमय झाला होता. त्याचा सर्वाधिक फटका कल्याण पूर्वेतील चक्की नाका भागातील शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या चेतना शाळेनजीकच्या सहा ते सात चाळींना बसला. अनेक कुटूंब राहत असलेल्या या चाळीत गुरूवारी रात्री पावणे अकरा वाजता पुराच्या पाण्याने विळखा घातला होता. त्यामुळे चाळीत राहणाऱ्या कुटूंबामध्ये भीती निर्माण झाली होती. तेथील नागरिक मदतीसाठी आरडाओरड करत होते. त्यानंतर स्थानिक समाजसेवक आणि काही तरुणांनी या चाळीत मदतीसाठी धाव घेतली होती.
शेकडो कुटूंबांचे स्थलांतर : काही वेळातच कल्याण पूर्व भागातील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'ड' आणि 'ह' या दोन प्रभागात असलेले अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांची बोटीच्या साहाय्याने सुटका करत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. यामध्ये ५० हून अधिक नागरिकांचा सामावेश होता. दरम्यान, कल्याणमधील वालधुनी नदीलगत असलेल्या अशोकनगर, सह अन्य वस्त्या तसेच खडेगोळववली, अडवली ढोकळी, आणि खाडी किनारी असलेल्या रेतीबंदर परिसरातील शेकडो कुटूंबांचे स्थलांतर करण्यात आले. आजही ठाणे जिल्ह्यात पावसाचा अलर्ट दिला आहे. त्यामुळे स्थलांतर झालेल्या नागरिकांच्या मनात घरातील साहित्याचे काय होईल? याची भीती वाटत असल्याचे दिसून आले.