उमेश माने पाटील, सहायक पोलीस आयुक्त ठाणे : एका वृद्ध महिलेला धारदार चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोनसाखळी घेऊन पळालेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रदीप उर्फ सोनु लालचंद विश्वकर्मा (वय 25 रा. बनेली टिटवाळा) आणि वसीम अब्दुल अन्सारी (वय 22 रा. आंबिवली, कल्याण) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
चाकूचा धाक दाखवून लुटले : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व भागातील नांदीवली परिसरात दुर्गावती गुलाबचंद सिंग (वय 63) ह्या वृद्ध महिला त्यांच्या कुटुंबासह राहतात. त्या रोज सकाळच्या सुमारास घरापासून नांदीवली रोडने फेरफटका मारतात. 25 एप्रिल रोजी सकाळी साडे सहा वाजता दुर्गावती ह्या नेहमी प्रमाणे फेरफटका मारून मलंग रोड येथील एस्सार पेट्रोल पंपाचे समोरील कट्टयावर येवून बसलेल्या होत्या. त्याच सुमाराला दोन अनोळखी इसम मोटार सायकलवून आले आणि त्यांनी दुर्गावती यांच्या समोर मोटार सायकल उभी केली. त्यातील एका इसमाने दुर्गावती यांना चाकूचा धाक दाखवून गळयातील सोन्याचे लॉकेट असलेली सोनसाखळी जबरदस्तीने खेचून नेली. त्यानंतर दोघेही गुन्हेगार मोटार सायकलवरून नांदीवली रोडने व्दारलीगावाच्या दिशेने पळून गेले.
दोन्ही आरोपींनी केला गुन्हा कबूल : त्यानंतर दुर्गावती यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यावरून कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला. एका गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार टिटवाळा नजीक असलेल्या बनेली गावात सापळा रचून प्रदीप उर्फ सोनु याला ताब्यात घेण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीवरून दुसरा साथीदार वसीम अब्दुल अन्सारी याला पोलीस पथकाने आंबिवली येथून ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांची अधिक चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.
12 तासांच्या आत गुन्हेगारांना अटक : अटक करण्यात आलेला गुन्हेगार प्रदीप उर्फ सोनु याच्यावर विविध पोलीस ठाण्यात एकुण 7 गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा दुसरा साथीदार वसीम याच्यावरही वेगवेगळया पोलीस ठाण्यात मालमत्तेचे 7 गुन्हे दाखल असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली आहे. विशेष म्हणजे गुन्हा घडल्यापासून कोळसेवाडी पोलीस पथकाने 12 तासांतच दोन्ही गुन्हेगारांना अटक केली आहे.
हे ही वाचा:Thane Crime : कल्याण डोंबिवलीत चोरट्यांचा धुमाकूळ, दोघांना अटक