ठाणे -कोरोनामुळे ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. आताच्या घडीला महापालिकेच्या तिजोरीत फक्त 95 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यात पालिका कर्मचाऱ्यांचा पगारही देण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका 1 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा विचार करत आहे. येत्या काही दिवसात नियोजन करण्यात येणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी (18 जून) झालेल्या सर्व साधारण सभेत सांगितले.
एमएमआरडीए, सिडकोच्या माध्यमातून कर्ज घेणार
'कोरोनामुळे आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे पालिकेचे कंबरडे मोडले आहे. कोविडमुळे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले आहेत. एकीकडे कराच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचे काम सुरू आहे. तर, दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर कोविडसाठी पैसे खर्च होत आहेत. त्यामुळे येत्या 7 दिवसात 1 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची तयारी पालिकेने दर्शवली आहे. यासाठी एमएमआरडीए आणि सिडको यांच्या माध्यमातून हे कर्ज काढण्यात येणार आहे. त्यापद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे. तसा विचार देखील केला असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक सुरू आहे. लवकरच निर्णय घेण्यात येईल', असे नरेश म्हस्के यांनी सांगितले.
निधी अभावी कामे रखडली
प्रभागातील नगरसेवकांची कामे रखडली आहेत. कामाचे सर्व ठराव केले जातील. तसेच नगरसेवकांची नाराजी दूर केली जाईल, असे आश्वासन महापौर म्हस्के यांनी दिले आहे. एकीकडे ठेकेदारांना पैसे देण्यासाठी पालिका तिजोरीत पैसे नाहीत. त्यामुळे कामे रखडले गेली असल्याचे भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी सांगितले. तर खर्चिक प्रकल्पावर होणारा खर्च कमी करावा आणि होणाऱ्या खर्चाचे पैसे पालिकेने वाचवणे गरजेचे आहे, असे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी सांगितले.