ठाणे- शहरातील रुग्णालयामध्ये कोरोनाशिवाय इतर कारणांमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्ययात्रेस जमा होणाऱ्या जवळच्या आप्तेष्ट, नातेवाईक व त्यांची मित्रमंडळी यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेवून खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित व्यक्तीचा मृतदेह घरी न पाठविता थेट स्मशानभूमीत पाठवण्यात येईल. तेथे कमीत कमी लोंकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात येतील. कोरोनाबाधित मृत व्यक्तींच्या मृतदेहावर संक्रमण प्रतिबंधक प्रक्रियेचे पालन करीत थेट स्मशानभूमीमध्ये दाहसंस्कार किंवा दफन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले असून तशी नियमावली शहरातील सर्व रूग्णालय प्रशासनाला पाठविण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी संभाव्य कोरोनाबाधित व्यक्तीचा, मृत्यू झाल्यानंतर अशा व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन न करता विल्हेवाट लावल्याचे निर्दर्शनास आलेले आहे. सदर मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर संबंधित मृत व्यक्तीचा कोरोनाचा नमुना अहवाल पॉझिटिव्ह म्हणून प्राप्त झालेला आहे, असा प्रकार पुन्हा घडल्यास संबंधित मृत रुग्ण व्यक्तीच्या अंत्ययात्रेस जमा झालेले त्यांचे जवळचे आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रमंडळी या सर्वांना कोरोनाची लागण होऊन त्यांच्या जीवाला धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर कोरोनाची लागण होवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रूग्णाचा मृतदेह घरी न पाठविता कमीत कमी लोंकांच्या उपस्थित त्यावर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सिंघल यांनी दिले आहेत.
केंद्र शासनाचे संभाव्य कोरोनाबाधित आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतदेह हाताळण्याबाबत दिशा निर्देश दिले आहेत. संभाव्य कोरोनाधित अथवा पॉझिटीव्ह रुग्णांचा मृतदेह हाताळतांना मानांकित संक्रमण प्रतिबंधक प्रक्रियांचे पालन करावे. यामध्ये हात धुणे, पीपीई किट वापरणे व मृत शरीरास लागलेल्या सर्व वस्तूंचे निर्जतृकाकरण करणे, मृत शरीराच्या बाहेरील बाजूस १टक्के हायपोक्लोराईटने निर्जतुकीकरण करुन शरीरास कोणतेही छिद्र नसलेल्या प्लास्टिक बॅाडीबॅगमध्ये ठेवणे, मृतदेह बॉडीबॅगमध्ये बंद केल्यानंतर सदरची बॉडीबॅग कोणत्याही परिस्थितीत उघडण्यात येऊ नये, सदर मृतदेह थेट शवागार किंवा स्मशानभूमी अथवा दफनभूमी येथे नेऊन त्याचा पीपाई किट घातलेल्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत दाहसंस्कार अथवा दफन करावे. त्यानंतर सदर मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचे निर्जतूकीकरण करून सर्व कचरा जैविक कचरा समजून त्याची जैविक वैद्यकीय कचरा विल्हेवाट नियमावली नुसार विल्हेवाट लावावी. अशा पद्धतीने संभाव्य कोरोनाबाधित व पॉझिटिव्ह रुग्णाचे मृतदेह हाताळणेबाबत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.