ठाणे - कोरोनाची लस आल्यास ती नगरसेवक, आमदार आणि खासदारांना प्रधान्याने द्यावी, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
माहिती देताना ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के लोकप्रतिनिधी हे कायम लोकांच्या संपर्कात असतात, करोना काळात लोकप्रतिनिधींनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे, त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे. यामुळे लोकप्रतिनिधींना प्राधान्याने लस द्यावी, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली.
म्हसके म्हणाले की, कोरोना महामारीचे संकट आल्यापासून आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करणे, आरोग्य यंत्रणा व सुविधा उपलब्ध करून देणे, रुग्ण्वाहिका उपलब्ध करून देणे, अशा असंख्य कामांमध्ये नगरसेवक आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून गेल्या सात, आठ महिन्यापासून काम करत आहे.
तसेच, महापालिका अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स आणि पोलीस या सर्व यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून स्थानिक लोकप्रतिनिधी कोरोनाच्या युद्धामध्ये प्रत्येक आघाडीवर काम करत असल्याने तो अनेकांच्या संपर्कात येत आहे. त्यामुळे, कोरोना प्रतिबंध लस वितरणाचा प्राधान्यक्रम ठरवताना त्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी व इतर शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचा देखील अग्रक्रमाने समावेश करावा, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
हेही वाचा -बलात्काराच्या गुन्हयात ताब्यात असलेला माजी उपनगराध्यक्ष पोलीस ठाण्यातून फरार