महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कळवा खाडीला पुन्हा अतिक्रमणाचा विळखा; जलवाहतुकीचे आराखडे केवळ कागदावरच - Thane Kalwa Creek Bridge

Thane Kalwa Creek Bridge : ठाणे शहराला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला असून त्यातून मुंबई आणि कल्याण, डोंबिवलीकडं जाणारा जलवाहतुकीचा मार्ग काढण्याचा विचार गेली अनेक वर्ष सरकार करत आहे. परंतु, याच खाडीला कळवा इथं मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्यांचा विळखा पडला असून भरावा टाकल्यामुळं खाडीचं पात्र अत्यंत अरुंद झालंय. त्यातच आता गायमुख येथील जेटी कोसळल्यानं सरकारचं जलवाहतुकीचं स्वप्न हवेतच विरतं की काय अशी शक्यता निर्माण झालीय.

Thane Kalwa Creek Bridge
कळवा खाडी

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 9:52 AM IST

कळवा खाडी

ठाणे Thane Kalwa Creek Bridge :ठाणे शहराला तलावांचं शहर तर म्हणतातच परंतु याच ठाणे शहराला जवळपास 27 किलोमीटर लांबीचा खाडी किनारा लाभला आहे. याच खाडी परिसरात जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळून येत असून जैव साखळीची परिसंस्था जपण्याच्या दृष्टीनं ठाणे खाडी परिसराला आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली आहे. याच खाडीकिनारी अत्यंत सुंदर अशा फ्लेमिंगो पक्ष्यासह अनेक प्रकारचे सुंदर पशुपक्षी आणि मासे आढळतात. याच खाडीमधून मुंबई आणि कल्याण डोंबिवली दिशेनं जलवाहतुकीचा मार्ग बनवावा, अशी राज्य सरकार तर्फे योजना आखली जात होती. परंतु, कळवा खाडी किनारी वाढणाऱ्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमुळं सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसत आहे.

महापालिकेचं काम म्हणजे केवळ दिखाऊपणा :कळवा खाडी किनारी वसलेल्या झोपडपट्टीला हटवण्याचं काम ठाणे महापालिकेनं केलं. परंतु, काही दिवसातच या झोपड्या पुन्हा आपल्या जागेवर उभ्या राहिल्यानं सरकारची डोकेदुखी वाढली आहे. खाडी किनारी तब्बल 65 चौरस किलोमीटरच्या परिसरात 17 चौरस किलोमीटर अभयारण्य असून उर्वरित जागेत परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम असल्यानं या क्षेत्रात इतर नवीन बांधकाम होणार नाहीत. त्यामुळं परिसरातील जैवविविधता जपणं सहज शक्य आहे. अशातच घोडबंदर रोड येथील गायमुख जवळील जेटीचा काही भाग खचल्यामुळं "महापालिकेचं काम म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे" असा आरोप पर्यावरण तज्ञ प्रशांत सिनकर यांनी केलाय. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, भिवंडी परिसराला जोडण्यासाठी मोठा जलवाहतूक प्रकल्प इथं राबवला जाऊ शकतो. परंतु, गायमुख इथल्या जेटी खचल्यामुळं या कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचं स्पष्ट झालंय. जलवाहतूक सुरू होण्यापूर्वी अशाप्रकारे जेटी खचणं ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितलं.


जेटीच्या बांधकामात अडथळे :जलवाहतुकीसाठी बांधण्यात आलेल्या जेटींना सुरुवातीपासूनच ग्रहण लागलं आहे. या जेटींच्या बांधकामादरम्यान कांदळवन काढून बांधकाम करण्यासाठी अनेक परवानग्या लागल्या. सरकारी नियमांची पायमल्ली होऊ नये, यासाठी सर्व परवानग्या मिळवत या जेटींचं काम सुरू आहे. अशातच जलवाहतुकीचे घोंगडे भिजत पडल्यामुळं प्रत्यक्षात ही वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी किती काळ लागेल, हे सरकारकडूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र तरी देखील वाहतूक कोंडीला त्रासलेले ठाणेकर या जलवाहतुकीकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत एवढं मात्र नक्की.

लवकरच दुरुस्ती करू : या संदर्भात मेरीटाईन बोर्डाचे अभियंता अजित मोहिते यांना विचारण्यात आलं असता, "जेटी खचण्याचा प्रकार अनेक दिवसांपूर्वी झाला असून आम्ही लवकरच दुरुती काम सुरू करत आहेत", असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा-

  1. ठाण्यात इमारतीला आग; एकाच कुटुंबातील दोघांचा होरपळून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश
  2. अर्धा तास उशिरा पोहोचल्यानं न्यायालयानं २ पोलिसांना ठोठावली गवत काढण्याची शिक्षा, पोलीस अधीक्षकांनी दिलं वरिष्ठ न्यायाधीशांना पत्र
  3. Thane Crime News : घरफोड्या करून चोरट्याने बांधला आलिशान बंगला; लक्झरी लाईफ पाहून पोलीसही चक्रावले

ABOUT THE AUTHOR

...view details