ठाणेThane Crime News : पावला पावलावर असते भय, अन सरकार म्हणे महिलासह मुलींच्या संरक्षणाची केली सोय. मात्र, असं असूनही गेल्या काही वर्षात महिलासह अल्पवीयन मुलींवर बलात्कारांच्या गुन्ह्यात कमालीची वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना अंबरनाथ शहरात घडली आहे. एका विधिसंघर्ष बालकाने ११ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात (Ambarnath Police Station)अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या विधिसंघर्ष बालकाला पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्याची रवानगी भिवंडीतील बालसुधार गृहात केली आहे.
विधिसंघर्ष बालकांनी केला अत्याचार : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवीयन मुलगी ११ वर्ष १० महिने वयाची आहे. ती कुटूंबासह अंबरनाथ पश्चिम भागात राहते. तर पीडितेच्या शेजारीच अंदाजे १६ ते १७ वयोगटाची असलेला विधिसंघर्ष बालक त्याच्या कुटूंबासह राहतो. त्यातच १६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या साडे आठच्या सुमारास पीडित मुलीला तो विधिसंघर्ष बालक घरानजीक असलेल्या चौकातील एका पुलाखाली अंधार असलेल्या ठिकाणी बहाण्याने घेऊन गेला. त्यानंतर त्या ठिकाणी तिला मारहाण करत अंधाराचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे भयभीत झालेली पीडिता त्याच्या तावडीतून सुटका करत घरी आली. त्यानंतर तिने घडलेल्या प्रकाराची माहिती तिच्या वडिलांना दिली. ही घटना ऐकून त्यांना धक्काच बसला.
विधिसंघर्ष बालक ताब्यात : वडिलांनी पीडित मुलीला घेऊन अंबरनाथ पोलीस ठाणे गाठत मुलीवर घडलेल्या प्रसंग सांगितला. घटनेची गांभीर्य ओळखून पोलिसांनी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३७६, ३७६( अ), (ब) आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, अंबरनाथ पोलिसांनी विधिसंघर्ष बालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला बाल न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी भिवंडी शहरातील बालसुधार गृहात करण्यात आल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. पी. मावळे करत आहेत.
बलात्कारांच्या गुन्ह्यात कमालीची वाढ :दिल्लीतील निर्भया हत्याकांडानंतर देशभर संपाताची लाट पसरून लाखो नागरिक अत्याचार कायद्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर अत्याचार कायदा मंजुर करूनही महिला व मुलींसाठी विविध राज्यात महिला अत्याचार विरोधात जनजागृती करत पोलीस प्रशासनाकडून महिलांचे सरंक्षण करण्याची हमी दिली होती. मात्र, गेल्या काही वर्षात ठाणे जिल्हात कमालीच्या वाढलेल्या बलात्कारांच्या घटना पाहता आजही महिलांना “पावला पावलावर असते भय, अन म्हणे केली संरक्षणाची सोय” अशी संतप्त प्रतिक्रिया अत्याचारग्रस्त पीडितांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -
- Nagpur Rape Case : कॉलेज विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरण; स्केचमुळं अखेर आरोपी अटकेत
- Sexually Assaults Case : अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भावासह पोलीस पदावर कार्यरत असलेल्या एकाला अटक
- Brother Sexually Assaults Minor Sister : सख्ख्या भावाचा अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार; पीडिता गरोदर