ठाणे- जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहरातील नागरिक सुखावले होते. मात्र, आता पावसाने पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. लांबणीवर गेलेल्या पावसामुळे ठाणेकरांना पुन्हा घामाच्या धारा सुटल्या आहेत. पाऊस गायब झाल्याने ठाण्यात अनेक ठिकाणी नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहेत.
पावसाने पाठ फिरवल्याने ठाण्यात पाणीकपात सुरू; ठाणेकर चिंताग्रस्त - पावसाने पाठ फिरवली
लांबणीवर गेलेल्या पावसामुळे ठाणेकरांना पुन्हा घामाच्या धारा सुटल्या आहेत. पाऊस गायब झाल्याने ठाण्यात अनेक ठिकाणी नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहेत.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पहिल्यापासूनच अत्यंत अपुरा पाणीपुरवठा होत होता. मात्र, पावसाने पाठ फिरवली असल्याने अनेक ठिकाणी एक दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. त्यातही कमी दाबाने, वेळी-अवेळी, अपुरे पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. पालिकेकडून पुरेसे पाणी न आल्यास हौसिंग सोसायट्यांना टँकरचे महागडे पाणी मागवे लागत आहे. जून महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, आता ही अपेक्षा फोल ठरली असून, पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान जून महिना असूनही गेले १० दिवस अधुनमधून किरकोळ सरी वगळता हवा तसा पाऊस झालेला नाही. उलट कडकडीत उन पडत असल्याने शेतीचे काय होणार असा प्रश्न ठाण्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पडला आहे.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. मात्र, यंदा उशिरा पोहोचलेल्या पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत ३६० मिलिमीटर पावसाने नोंद केली होती. मात्र, यंदा फक्त १६० मिलिमीटरच पावसाची नोंद झाले असल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान लांबणीवर गेलेल्या पावसाने नागरिकांची चिंता वाढवली आहे.