ठाणे : तीन मित्र दारू पीत बसले असता, त्या ठिकाणी येऊन मुलीची बॅग चोरल्याच्या संशयातून तिघा पैकी एकाला टेम्पो चालकाने मारहाण केली होती. त्यानंतर मारहाणीचा बदला घेण्यासाठी दोघा मित्रांनी मिळून त्या टेम्पो चालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यात कोनगावातील गावदेवी मंदिराच्या पुढे असलेल्या कचरा कुंडीजवळ घडली आहे.
खुनाचा गुन्हा दाखल :याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून एका आरोपी मित्राला अटक केली आहे. दुसरा आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. आतिक काझी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर राकेश उर्फ रवी मोरे असे, फरार आरोपीचे नाव आहे. गोविंद उर्फ बबलू वामन कांबळे (वय, ४०) असे खून झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.
लाकडी दांडक्याने मारहाण :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक गोंविद हा भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील कोनतरी बकरा मंडी परिसरात कुटूंबासह राहत होता. त्यातच १ मार्च रोजी बुधवारी सायंकाळच्या सुमारास राजकुमार उर्फ राजा मंगरू लोहार (वय ३२) हा आरोपी मित्र आतिक, राकेश उर्फ रवी सोबत कोनगावातील गावदेवी मंदिराच्या पुढे असलेल्या कचरा कुंडीजवळ पत्ते खेळत दारू पीत तिघेही बसले होते. त्याच सुमाराला मृत गोवींद हा त्याचा मित्र प्रकाश डोंगरेला घेऊन त्या ठिकाणी आला. तिघा यापैकी राजकुमार उर्फ राजा याला मुलीची बॅग चोरल्याच्या संशयातून लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यावेळी मित्राला मारहाण केल्याच्या वादातून आरोपी आतिक, राकेश उर्फ रवी या दोघांनी गोविंद उर्फ बबलू याच्यावर लाकडी दांडक्यासह धारदार शस्त्राने वार करत कचरा कुंडीजवळ त्याचा खून केला.
आतिक काझीला अटक : मृत गोवींद सोबत आलेला मित्र प्रकाश डोंगरे हा जिवाच्या भीतीने घटनास्थळावरून पळून गेला. तर त्याचवेळी दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. या घटनेची माहिती कोनगाव पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत गोविंद उर्फ बबलूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. मृतकचा भाऊ अरविंद वामन कांबळे याच्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दीप बने यांच्यासह त्यांच्या पथकांने आरोपी आतिक काझी याला सापळा रचून अटक केली. मात्र दुसरा आरोपी राकेश उर्फ रवी हा फरार असून त्यालाही लवकरच अटक करू, असा विश्वास तपास अधिकारी दीप बने यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -Onion Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कांद्याला मिळणार 'इतके' अनुदान