ठाणे -कोविडची आव्हाने असूनही, पुरवठा साखळी चालू ठेवण्यासाठी रेल्वे आवश्यक वस्तू व इतर साहित्याची वाहतूक करीत आहे. अश्यातच मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची काही ठराविक फेऱ्यानंतर नेमलेल्या ठिकाणी तपासणी केली जाते. या कामासाठी पूर्वी पुरुष कामगारांची नेमणूक करण्यात आली होती. आता मात्र मध्य रेल्वेवर प्रथमच मालवाहतूक करणाऱ्या रेकची/ट्रेनची सखोल तपासणीसाठी १० महिलांची टीम कल्याण गुड्स यार्डात तयार केली आहे. अशा प्रकारचे काम करणारी ही पहिली महिला टीम ठरली आहे.
मालवाहतूक ट्रेनची अशी केली तपासणी -
रेल्वेत स्टील लोडिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ४४ बीओएसटी प्रकारच्या रिक्त वॅगनच्या रॅकची तपासणी या महिला टीमने केली. यामध्ये गीअर तपासणी, एअर ब्रेक टेस्टिंग, अंडर फ्रेम्सची तपासणी, साइड पॅनेल्स आणि सदोष घटक आणि संबंधित दुरुस्त्याही त्यांनी केल्या. १० जणींच्या टीमने हे कौतुकास्पद काम केल्याचे आधिकाऱ्यांनी सांगितले.