ठाणे - ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी पालिका शाळांच्या शौचालयांमध्ये १ कोटी ४० लाखांच्या हॅन्ड वॉश खरेदी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रस्तावाविरोधात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. पालिका शाळांच्या अनेक शौचालयांमध्ये पाणी उपलब्ध नाही. या शौचालयांमध्ये मूलभूत सुविधादेखील उपलब्ध नसल्याने १ कोटी ४० लाख खर्च करून हॅन्ड वॉश खरेदी करण्याची आवश्यकता काय ? असा सवाल संबंधित संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
करोडोंच्या हॅन्ड वॉश विरोधात 'स्वाभिमानी' चे आंदोलन हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी नौपाडा येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. शिक्षण विभागाला यावेळी शौचालयांच्या स्वच्छतेसाठी फिनाईलच्या आणि पाण्याच्या बाटल्या तसेच कडी-कोंडे भेट देण्यात आले. हा प्रस्ताव जर रद्द केला नाही, तर न्यायालयात जाण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
ठाणे महापालिकांच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या स्वच्छतेकडे आणि त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये हॅन्ड वॉश बसवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, हा प्रस्ताव आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्वाभिमानी संघटेनेचे ठाणे शहर अध्यक्ष विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. काही पालिका शाळांची परिस्थिती चांगली नाही. शौचालयांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे.
अनेक शौचालयांमध्ये पाणी उपलब्ध नाही. दरवाज्यांच्या कड्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. शौचालये स्वच्छ करण्यात येत नाहीत. जर या मूलभूत सुविधा मुलांना मिळत नसतील हा तर १ कोटी रुपये खर्च करून हॅन्ड वॉश खरेदी करण्याची आवश्यकता काय? असा प्रश्न संघटनेचे शहर अध्यक्ष विजय त्रिपाठी यांनी उपस्थित केला आहे. हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी शिक्षण मंडळाच्या बाहेर यावेळी निदर्शने करण्यात आली.
ठाणे महापालिकेच्या शाळांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, शाळांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, शाळांच्या इमारती दुरुस्त करण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांना देण्यात आले आहे.