ठाणे -कल्याण शहरातील मानवी वस्तीत गेल्या ४ महिन्यांपासून शेकडो विषारी-बिन विषारी सापांचा वावर आढळून येत आहे. या सापांना सर्पमित्रांनी पकडून जीवदान दिले. त्यातच पुन्हा कल्याण पश्चिम परिसरात ३ वेगवेगळ्या ठिकाणी काल(शनिवार) रात्रीच्या सुमारास विषारी घोणस साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पहिली घटना कल्याण पश्चिमेकडील पौर्णिमा चौकात सृष्टी सोसायटीत घडली आहे. या सोसायटीच्या आवारातील पार्किंगमध्ये एक रहिवाशी आपली दुचाकी पार्क करण्यासाठी गेला असता, त्याला एका वाहनाखाली साप दिसला. त्याने सोसायटीच्या रहिवाशांना सोसायटीच्या पार्किंगमध्ये साप शिरल्याची माहिती दिली. त्यानंतर एका रहिवाशाने 'वार संस्थे'चे सर्पमित्र हितेशला संपर्क करून कळविले. काही वेळातच सर्पमित्रांनी घटनास्थळ गाठून सापाला पकडले. हा साप घोणस जातीचा असून साधारण ३ फूट लांबीचा आहे.
दुसऱ्या घटनेत कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावातील कैलास पाटील यांच्या बंगल्याच्या आवारातील एका ड्रममध्ये पालापाचोळ्याचा आधार घेत ६ फुट लांब विषारी घोणस साप शिरला. याबाबत त्यांनी तातडीने सर्पमित्राला संपर्क करून माहिती दिली. सर्पमित्राने बंगल्यासमोरील गार्डनच्या भिंती लगत असलेल्या ड्रममधून पालापाचोळ्यात लपलेल्या विषारी घोणसला पकडले.