ठाणे - कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या सेंट थॉमस शाळेकडून विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी पालकांना सक्ती केली जात आहे. लॉकडाऊनमुळे पालकांच्या हाती पैसा नाही. ते इतकी फी कशी आणि कुठून भरणार? असा सवाल उपस्थित करीत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी फी साठी सक्ती केल्यास शिवसेना स्टाईलने शाळेविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला.
शाळेच्या फीसाठी सक्ती कराल तर... - saint thomus school kalyan east
शाळेच्या फीसाठी सक्ती कराल तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाण्यात शिवसेनेने दिला आहे.
शाळा सुरू झाल्यावर पालकांकडून विद्यार्थ्यांची फी घ्या, असे सरकारच्या शिक्षण खात्याचे आदेश आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा बंद आहेत. शाळांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाते आहे. ऑनलाईन शिक्षण असताना सेंट थॉमस शाळेकडून पालकांकडे फी भरण्याची मागणी केली जात आहे. शाळा सुरू असताना एका विद्यार्थ्याकडून 19 हजार रुपये फी घेतली जात होती. लॉकडाऊनमुळे पालकांच्या हाती पैसा नाही. अनेक पालकांचे रोजगार गेले आहे. तसेच काही पालकांची पगार कपात झाली आहे. त्यात घराच्या कर्जाचे हप्ते, घरभाडे याचा खर्च आहे. हे सर्व थकले असताना फी कुठून भरायची? असा प्रश्न आहे.
शाळेकडून फी भरण्याकरीता सक्ती केली जात असल्याने पालकांनी शिवसेनेकडे दाद मागितली. यानंतर शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी पालकांसह शाळेत धाव घेतली. यावेळी त्यांनी पालकांकडे फीसाठी सक्ती का केली जात आहे? असा सवाल करत फीबाबत सक्ती करु नका. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शाळा व्यवस्थापनाला दिला. तर याप्रकरणी शाळा व्यवस्थापनातील एकही जबाबदार व्यक्ती गायकवाड यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आला नाही. दरम्यान, याप्रकरणी शाळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.