ठाणे :छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्रासह देशातील जनतेच्या मनात आदराचे स्थान असून त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या व्यंकय्या नायडू यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. पण त्यांचा अवमान होत असताना छत्रपतींचे वंशज असणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी ते ऐकूण घेतले. याची कीव करावीशी वाटते अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे भिवंडी तालुका प्रमुख विश्वास थळे यांनी दिली आहे. यामुळे कोरोनाच्या महामारीतही राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी दिल्लीत पार पडला. राज्यसभा सदस्य म्हणून शपथविधी प्रसंगी उदयनराजे भोसले यांनी शपथ ग्रहणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राज्यसभा सदनांत घेऊ नये, हे माझे सदन आहे असे वक्तव्य उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी केल्याने तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहे. याचे पडसाद भिवंडीतही उमटले असून शिवसेना भिवंडी तालुका वतीने पंचायत समिती कार्यालय परिसरात व्यंकय्या नायडू यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.