ठाणे - भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये. तसेच राजकारणात कुणीही कुणालाही भेटु शकतो. कुणी कुणाला भेटावे, यावर बंदी नाही, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ठाणे महापालिकेत नवनिर्वाचित सभागृह नेते अशोक वैती यांना शुभेच्छा देण्यासाठी शिंदे येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे यांच्या पक्ष सोडण्याच्या वावडया उठत आहेत. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, खडसे हे सर्वांचेच मित्र आहेत. अनेकांसोबत त्यांनी एकत्र काम केलेले आहे. तसेच त्यांचे हे अनेक वर्षांचे स्नेह संबंध आहेत. त्यामुळे खडसे-पवार भेटीचा वेगळा अर्थ काढू नका. तसेच लोकशाहीत कुणीही कुठेही जाऊ शकतो. कुणी कुणाला भेटावे यावर बंदी नाही, असेही ते म्हणाले.