ठाणे - आयुष्यभर शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या 64 वर्षीय कट्टर शिवसैनिक गंभीर आजाराने ग्रस्त असूनही आयुष्याच्या अशा वळणावर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा उशाजवळ ठेवून पूजा करत आहे. नंदकुमार सावंत, असे त्या कट्टर शिवसैनिकाचे नाव आहे. त्यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुबीयांनी राहते घर विकले, जवळचे सर्व पैसेही उपचारासाठी खर्च केल्याने सध्या सावंत कुटुंबीय हालाखीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे कट्टर शिवसैनिकाच्या मुलीने शिवसेना नेत्यांनी उपचारसाठी एकत्र येऊन मदत करावी, अशी याचना करत असल्याची बातमी 'ईटीव्ही भारत'ने मागील आठवड्यात प्रसारित केली होती. त्यानंतर सावंत कुटुंबीयांसाठी शिवसेना नेत्यांकडून मदतीचा ओघ सुरूच झाला आहे. मंगळवारी (दि. 14 सप्टेंबर) ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी उपचारासाठी लागणारी मदत जाहीर केली आहे.
शिवसेना वैद्यकीय सेवा विभागानेही केली मदत जाहीर
'ईटीव्ही भारत'च्या बातमीनंतर शिवसेना वैद्यकीय सेवा विभागातील डॉक्टरांचे पथक नंदकुमार सांवत यांच्या घरी जाऊन त्यांच्या उपचाराबाबत माहिती घेतली. त्यांना लागणारी औषधे दिली जाणार असल्याचेही शिवसेना वैद्यकीय सेवा विभागाकडून सांगण्यात आले. तर दादरच्या शिवसेना भवन मधूनही मदतीसाठी सांवत कुटूंबाशी संपर्क केल्याचे सांगण्यात आले.