ठाणेShiv Bhojan Thali : तीन वर्षांपूर्वी सुरू झालेली शिवभोजन योजना आणि त्याकाळी असलेली महागाई आणि आताच्या महागाईमुळे कडधान्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. अशाच अनेक वर्षापूर्वी राज्यात सेना भाजपा युतीच्या काळात अवघ्या १ रुपयात झुणका भाकर केंद्र सुरू (Jhunka Bhakar) झाली आणि गोरगरिबांना पोटभर अन्न मिळू लागले होते. कालांतराने ही केंद्रे महागाईमुळे बंद होऊन केंद्र चालकांनी याच झुणका भाकर केंद्रात इतर व्यवसाय सुरू केले. कोरोनाच्या आधी पुन्हा एकदा राज्य सरकारतर्फे १० रुपयात शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली. सध्या जिथे साधा वडापाव देखील १५ ते २० रुपयात मिळतो तिथे केवळ दहा रुपयात दोन चपात्या, वरण-भात भाजी असा संपूर्ण आहार मिळू लागल्याने, गोरगरिबांच्या भुकेल्या पोटाला आधार मिळाला.
सबसिडी वाढवून द्यावी : राज्य सरकारने बांधकाम प्रकल्पवरील मध्यान्ह भोजन योजना १ नोव्हेंबरपासून बंद केल्याने, हे कामगार देखील याच योजनेचा लाभ घेतात. दररोज शेकडो गोरगरीब कष्टकरी या केंद्रांवर आपली भूक भागवतात. त्यासोबतच ज्यांच्या घरी डबा करणारे कोणी नाहीत अशी मंडळी देखील या योजनेचा लाभ घेतात. या थाळीचे मूळ मूल्य ५० रुपये असून राज्य सरकार तर्फे ४० रुपये सबसिडी देण्यात येते. त्यामुळे केंद्र चालकांना थाळी मागे ५० रुपये मिळतात. परंतु वाढलेल्या महागाईने आता ही थाळी या दरात देणे परवडत नसल्याचं, केंद्र चालकांनी सांगितलं. सध्या जेवण बनविण्यास अत्यावश्यक असणारे कांदा, लसूण, टोमॅटो, डाळी तसंच इतर भाज्यांचे भाव कडाडले आहेत. ही केंद्रे देखील झुणका भाकर केंद्रांप्रमाणे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ही केंद्रे जर बंद पडली तर येथे दरदिवशी जेवणाऱ्या कष्टकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळं सबसिडी वाढवून द्यावी अशी मागणी केंद्रचालकांनी केली आहे.