ठाणे : बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी खास बकरा हवा असतो, बकरी ईद म्हणजे ईद-उल-अधा हा त्यागाचा सण म्हणूनही मुस्लिम धर्मीय मोठ्या उत्सवात साजरा करत असतात. 'शेरू' नावाच्या बोकडाची किंमत थक्क करणारी ठरली होती. विशेष म्हणजे या बोकडाच्या अंगावर 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' असे उर्दू भाषेतील शब्द असल्याने, त्याच्या अंबरनाथमध्ये राहणाऱ्या मालकाने त्याची १ कोटी १२ लाख ७८६ रुपयांची किंमत ठरवली होती. मात्र बकरी ईद काही दिवसावर येऊन ठेपली असतानाच, १०० किलो शेरूचे आजारपणामुळे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
असा होता शेरू : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील तहसील कार्यालयाच्या मागच्या बाजूने असलेल्या सिद्धार्थ नगरमध्ये, शकील शेख हा कुटूंबासह एका पत्र्याच्या खोलीत राहतो. तो अंबरनाथ रेल्वे स्थानका समोरील मार्गावर रेडिमेड कपड्यांची विक्री करून उदरर्निवाह करतो. विशेष म्हणजे शकीलला बोकड आणि बकरी पाळण्याची आवड असून त्याच्या घरच्या बकरीला दीड वर्षांपूर्वी एक पिल्लू झाले होते. त्यावेळी त्याचे नाव शकीलने 'शेरू' म्हणून ठेवले. शकीलच्या घरची गरीब परिस्थितीत राहूनही या बोकडाला श्रीमंती सारख्या थाटात लहानपणापासून प्रेमाने वाढवत शकीलने मोठे केले होते. या बोकडाच्या मानेवर जन्मापासून नैसर्गिकरित्या 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' असे उर्दू भाषेतील शब्द अंगावर दिसत होते. तर या बोकडाला केवळ दोनच दात होते त्याचे वजन १०० किलो होते.