ठाणे - गणेश नाईक यांनी नवी मुंबईला विकसित केले आहे. त्यांनी अखंड काम केले आहे. तरीही त्यांचा मागील निवडणुकीमध्ये पराभव झाला. त्यामुळे त्यांचा पराभव हा मतदान यंत्रातील गडबडीमुळेच झाला असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मतदान प्रतिनिधींसह मतदान यंत्रावर बाराकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथून काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याचा मंत्र दिला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
शरद पवार यांनी यावेळी सांगितले, की ठाणे लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत संजिव नाईक यांचा पराभव झाला होता. संजिव नाईक हे जागरुक सदस्य होते. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्दे आपण स्वत: पाहिलेले आहेत. तरीही, आपण कुठे तरी कमी पडलो आहोत. याचा विचार करण्याची गरज आहे. नवी मुंबईला गणेश नाईक यांनी आदर्श शहर केले आहे. अखंड काम करणार्या व्यक्तीचा पराभव होण्यामागे मतदान यंत्रातील गडबडी हेच कारण आहे. सहा महिन्यापूर्वी गोंदिया-भंडारा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत ७०० बूथवरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाला होता. कोणालाही मत दिले तर ते ठराविक चिन्हालाच जात होते. ही बाब तत्कालीन उमेदवार कुकडे यांनी सांगितल्यानंतर आपण निवडणूक अधिकार्यांशी बोलून मतदान यंत्रे बदलून वेळ वाढवून घेतली. त्यानंतर झालेल्या मतदानात कुकडे हे विजयी झाल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.