ठाणे : रशिया - युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात शेकडो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने हालचाली सुरू करून विमाने पाठवली आहे. या विद्यार्थांमध्ये ठाणे जिल्ह्यातील ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
रशिया-युक्रेन युद्धात ठाणे जिल्ह्यातील ७ विद्यार्थी अडकले
ठाणे जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अडकलेले ७ विद्यार्थी मुरबाड, भिवंडी, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथील आहेत. ठाणे जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातर्फे युक्रेन येथे अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी दिलेल्या हेल्पलाइनवर या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संपर्क साधला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह काही नागरिकही असल्याचे आता समोर आले आहे. ७ विद्यार्थ्यां पैकी ३ विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन येथे गेले असून ठाणे जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी प्रसीद्ध पत्रक जाहीर करून केले आहे.