महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

School Wall Collapsed : वर्ग सुरू असतानाच शाळेची भिंत कोसळली; परिसरात एकच गोंधळ - शाळेची भिंत कोसळली

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील एका ४५ वर्षीय जुन्या इमारतीच्या शाळेची भिंत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी दुपारच्या सुमारास नारपोली परिसरात घडली. या इमारतीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव सुदैवाने वाचला आहे. त्यामुळे वर्धमानसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली आहे.

School Wall Collapsed
शाळेची भिंत

By

Published : Jul 24, 2023, 10:17 PM IST

शाळेची भिंत कोसळल्याबाबत स्थानिकाची प्रतिक्रिया

ठाणे : भिवंडीत गेल्याच महिन्यात वर्धमान इमारत कोसळून ८ जणांचा जीव गेला होता. त्यानंतर शहर व ग्रामीण भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्न निर्माण झाला असतानाच, वर्ग सुरू असतानाच धोकादायक इमारतीच्या शाळेची भिंत कोसळली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. वर्धमान इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती जरी टळली, तरी मात्र शाळेची मोठी वित्तहानी झाल्याने भिवंडी महापालिकेचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.



संपूर्ण भिंतच गल्लीत कोसळली :मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील विठ्ठलनगर परिसरातील खैरूनिसा सिद्दीकी यांच्या मालकीच्या ४५ वर्षे जुन्या दुमजली इमारतीच्या तळ मजल्यावरील पाठीमागच्या बाजूची भिंत सोमवारी शाळा सुरू असताना दुपारच्या सुमारास कोसळली. पहिल्या मजल्यावरील शाळेच्या एका बाजूची संपूर्ण भिंत लगतच्या गल्लीत कोसळली. या दुर्घटनेनंतर काही विद्यार्थ्यांना इमारतीमधून सुरक्षित बाहेर काढण्याचे मदतकार्य परिसरातील नागरिकांनी केले. या इमारतीच्या तळ मजल्यावर काही दुकाने असून एका बाजूला रहिवाशी राहत आहेत. तसेच यामध्ये इंग्रजी व उर्दू माध्यमिक शाळा २५ वर्षांपासून सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या शाळेत १०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

अधिकारी घटनास्थळी झाले दाखल :या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या एका गाडीला पाचारण करण्यात आले होते. तसेच २ एम्ब्युलन्स व महापालिका आपत्कालीन विभागाचे काही कर्मचारी आणि त्यांच्यासह प्रभाग समिती क्र.४ चे सहाय्यक आयुक्त गिरीष घोष्टेकर, उपायुक्त दीपक झिंजाड, प्रणाली घोंगे घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

तर तोडक कारवाई का नाही -दुर्घटना घडली त्यावेळी जोरदार पाऊस सुरू होता. भिंत कोसळलेल्या गल्लीत कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या इमारतीला धोकादायक घोषित करूनही इमारतीवर तोडक कारवाई का केली नाही? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान इमारत तात्काळ रिकामी करून ती तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत संपूर्ण इमारत तोडण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा:

  1. Kurla Building Collapse : मुंबईत इमारत कोसळली, मृतांच्या वारसांना सरकारची पाच लाख रुपयांची मदत
  2. मुंबई : मोडकळीस आलेल्या इमारतीचा काही भाग कोसळला, जीवितहानी नाही
  3. मुंबईत इमारतीचा भाग कोसळला; जीवितहानी नाही, 17 जणांना सुखरूप काढले बाहेर

ABOUT THE AUTHOR

...view details