नवी मुंबई - कोपर खैरणे परिसरात दिवसाढवळ्या 'सारस्वत' बँकेवर दरोडा पडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. बँकेत आलेल्या दोन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लॉकरमधील सुमारे साडेचार लाखाची रक्कम चोरली आहे. भरदुपारी घडलेल्या घटनेमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.
नवी मुंबईत भरदिवसा चोरट्यांनी 'सारस्वत बँक' लुटली.. - saraswat bank news
कोपर खैरणे परिसरात दिवसाढवळ्या 'सारस्वत' बँकेवर दरोडा पडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.
नवी मुंबईतील कोपर खैरणे सेक्टर 19 येथील सारस्वत बँकेत दुपारच्या सुमारास 6 ते 7 कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बँकेत आलेल्या दोघांनी एका कर्मचाऱ्याच्या मानेला चाकू लावला व त्यानंतर लॉकर उघडायला लावून त्यामधील सुमारे साडेचार लाख रुपये लुटून पोबारा केला.
या घटनेनंतर बँक कर्मचाऱ्यांनी पोलीस कंट्रोलला कळवले. त्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला आहे. बँकेत आलेले दोन्ही चोरटे 30 ते 35 वयोगटातील असून, ओळख पटू नये म्हणून दोघांनीही तोंडाला मास्क लावले होते व हाताचे ठसे उमटू नयेत म्हणून हातात हॅन्डग्लोज घातले होते. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत. तसेच कोपर खैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.