नवी मुंबई - महापालिकेतील ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या किमान वेतनातील एकूण ९० कोटी रुपयांची थकबाकी द्या. अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
नवी मुंबई महापालिकेतील ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या किमान वेतनातील एकूण ९० कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समिती मंजूर करत नसल्याने, यासंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळावेत, यासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेने'कडून सातत्याने महापालिका प्रशासनाकडे प्रयत्न केले जात आहेत. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रशासकीय बाबी पूर्ण केल्यानंतरही सत्ताधारी असलेल्या भाजपकडून जाणीवपूर्वक कंत्राटी कामगारांचा प्रस्ताव स्थायी समितीकडून ३ वेळा मंजूर करण्यात आलेला नाही. सत्ताधारी असलेल्या नाईक कुटुंबीयांनी कंत्राटी कामगारांचे संपूर्ण श्रेय घ्यावे. परंतु, कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे द्यावेत, अशी विनंती देशपांडे यांनी यावेळी केली.
हेही वाचा - ठाण्यात मनसेची पोस्टरबाजी; राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी पूर्ण