ठाणे -उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार 21 वर्षाची वयाची अट पूर्ण न झाल्याने एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा सदगुरु हॉटेल्सचा बार परवाना कायमस्वरूपी रद्द (Sadguru restro bar license cancels) करण्यात आला आहे. या प्रकरणात चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी (Thane Collector) ही कारवाई करून याबद्दल आदेश उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत.
निलेश सांगडे - अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात मागील अनेक दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे. यानंतर उत्पादन शुल्क विभागाने समीर वानखेडे यांच्या वयाबद्दल प्रशचिन्ह उपस्थित केले होते. या वादानंतर चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर वानखेडे यांच्या वयाचे पुरावे उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. वानखेडे यांना याबाबत पुरावे देण्यासाठी वेळ दिला आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
ठाण्याचे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर यांनी वानखेडेंचा बार परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले असल्याने त्या अनुशंगाने कारवाई होणार आहे. वयाच्या 17व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या आधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या अंतर्गतच परवाना घेण्याच्या वेळी वय कमी असल्याने आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने वानखडे यांच्या वाशी येथील सतगुरू बारचा परवाना रद्द केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग या बारचा मुद्देमाल ताब्यात घेणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली.
वयाची पूर्तता न करता वानखेडे यांना परवाना दिला त्यावेळी उत्पादन शुल्क विभागाने कागदपत्र तपासणी केली होती का? वयाबाबत आता कागदपत्र कशी गहाळ झाली? याचा खुलासा होणे गरजेचे आहे. समीर वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात काम करत होते. त्यामुळे परवाना देताना कोणाकडून झुकते माप दिले का? याचा शोध आता घेणे गरजेचे आहे. या परवाना देण्यामागे त्यावेळी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणे गरजेची असल्याचे समोर येत आहे.
समीर वानखेडे यांच्या सतगुरु या बारवर आता जप्तीची कारवाई होणार आहे. या बारमध्ये असलेल्या दारू आणि इतर कागदपत्र रजिस्टरवर जप्तीची कारवाई उत्पादन शुल्क विभाग करणार आहे. आता हा बारचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचेही उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे.