ठाणे - तिसऱ्यांदा वाढवलेल्या लॉकडाऊनमुळे आता छोट्या दुकानदारांसह परंपरागत व्यवसाय करणाऱ्यांनाही आर्थिक फटका बसला आहे. त्यातच मुरबाडच्या एका केशकर्तनकाराने कुटुंबाला जगविण्यासाठी शक्कल लढवत कैची बाजूला ठेवून चक्क हातात तराजू घेऊन टॉमेटो विकत असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाबाधितांची संख्या देशासह राज्यात विशेषतः मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा रेड झोन म्हणून शासनाने जाहीर केला. सहाजिक रेड झोनमधील अतीआवश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद आहेत. असाच ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरातील लॉकडाऊन व संचारबंदीचा मोठा आर्थिक फटका येथील सलून आणि अन्य लहानसहान व्यवसायिकांना बसला आहे.
कैची ठेवली बाजूला अन् हातात घेतला तराजू; जगण्यासाठी लढवली शक्कल मुरबाडमधील सर्वच लहानसान दुकानासह सलून बंद आहेत. त्यामुळे कुटुंबाच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न रुपेश पावडे या सलून व्यासायिकासमोर उभा ठाकला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात आपला परंपरागत व्यवसाय सोडून अत्यावश्यक सेवेतील भाजी विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. तर काही छोट्या दुकानदारांनीही भाजीपाला, अंडी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे पाहवयास मिळत आहे. विशेष म्हणजे रोजी रोटीचा मार्ग काढण्यासाठी काही सलून व्यावसायिकांच्या हातात कैची ऐवजी आता तराजू दिसतोय.
आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून मुरबाडमधील सलून व्यवसायीक रुपेश पावडे या तरूणाने चक्क टॉमेटो विकण्याचे सुरू केले आहे. तर बांगडी व्यवसाईक समीर मानियार यानेही अंडी, टोस्ट, बटर, फरसाण विक्रीचा धंदा सुरू केला आहे. आपल्या परंपरागत व्यवसायाला फाटा देत या तरूणांनी पोटाची खडगी भरण्यासाठी इतर व्यवसाय सुरू केल्याचे दिसून येत आहे. आता तर शासनाने अनेक व्यवसायांना सशर्त परवानगी दिलेली आहे. त्या अनुषंगाने सलून व्यवसायालाही परवानगी द्यावी, अशी मागणी सलून व्यावसायिक रुपेश पावडे यांनी केली आहे.