ठाणे- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील मताचे कौल ईव्हीएममध्ये सील झाले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. तर चौथ्या टप्प्याच्या प्रचारांच्या तोफा जोरजाराने धडाडू लागल्या आहेत. चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या ठाणे मतदारसंघात यावेळीही चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी शिवसेनकडून विद्यमान खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद पंराजपे हे रिंगणात आहेत. या दोन्हीही प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांच्या या तुल्यबळ लढतीचा घेतलेला विशेष आढावा.
ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, भूमिपुत्र, मराठी, आगरी मतदारांची मोठ्या प्रमाणात संख्या होती तोपर्यंतच ठाण्यात शिवसेनेचा किल्ला राहिला. परंतु कालांतराने ठाण्याचे वाढलेले नागरीकरणामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात बहुजनाचा, विविध जाती जमातीचा वावर वाढला. याच कारणामुळे शिवसेनेतून राष्ट्रवादीत घरोबा केलेल्या गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदार संघावर २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदार संघातून संजीव नाईक यांनी विजय मिळवला. त्यानंतर पुन्हा वाढलेल्या नागरीकरणाचा फटका ठाणे लोकसभा मतदारसंघावर कब्जा करणाऱ्यांना बसला.
२०१४ च्या निवडणुकीच्या मोदी लाटेत शिवसेनेचे राजन विचारे अनपेक्षितपणे निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधी लाट आली आणि राजन विचारे यांनी संजीव नाईक यांचा तब्बल २ लाख ८५ हजार मतांनी पराभव केला. थोडक्यात ठाणे लोकसभा मतदार संघात एकाच पक्षाला अनेकवर्ष सत्ता काबीज करण्याचे भाग्य हे शिवसेनेला त्या काळात मिळाले. त्यानंतर मात्र या मतदारसंघातील कब्जेदार सतत बदलत राहिले.
मतदारसंघावर राष्ट्रवादी कब्जा करण्याचे संकेत-
मोदी लाटेत २०१४ ला राजन विचारे हे २ लाख ८५ हजार मतांनी निवडून आले. त्याच राजन विचारेंना २०१९ ची निवडणूक जड जात असलायचे चित्र सध्या दिसत आहे. मोदी लाट जवळपास संपली आणि आक्रोश पुढे आल्याने २०१४ च्या निवडणुकीत विचारेंनी जेवढा लीड घेतला होता. तेवढी मते आता मिळतील का? असा प्रश्न आताच्या परिस्थित निर्माण झाला आहे. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी पुन्हा ठाणे लोकसभा मतदारसंघावर कब्जा करेल असेच सकारात्मक चित्र दिसत आहे.
खरे तर मागच्यावेळी पराभव झालेले डॉ. संजीव नाईक यांना या निवडणुकीत निश्चितच यश लाभण्याची तीव्र शक्यता असताना त्यांनी माघार घेतल्याने शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले आनंद परांजपे यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकिटावर ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रणागंणात उडी घेतली आहे.
उमेदवारांची माहिती
या मतदारसंघात एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र येथील खरी लढत युती आणि आघाडीच्या उमेदवारांमध्येच पाहायला मिळणार आहे.
शिवसेना - राजन विचारे
ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक, महापौर, आमदार आणि २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांचा पराभव करुन खासदार, शिक्षण १२ वी पर्यंत. पाच वर्षे अनेकदा वादात सापडले.
राष्ट्रवादी - आनंद परांजपे
ठाणे लोकसभेचे खासदार २००८-०९ त्यानंतर कल्याणचे खासदार (२००९ ते २०१४), २०१४ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश यावेळी शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. सध्या ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत, वडील प्रकाश पराजंपे यांच्या भरीव कामाचा फायदा त्यांना होऊ शकतो, सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि आंदोलनाच्या माध्यमातून ओळख निर्माण झालेला चेहरा. या शिवाय मनसेचा जाहीर पाठिंबा मिळाला असल्याने यांचे पारडे जड मानले जात आहे.
मल्लीका अजरुन पुजारी- (भारिप - वंचित बहुजन आघाडी) नवी मुंबईमधील विकासक, भारिपचे कार्यकर्ते एवढीच ओळख.
या निवडणुकीत आपची भुमिका मात्र तळ्यात-मळ्यात आहे. निवडणुकीबाबत अद्यापही त्यांचा निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र क्रांती सेनेकडून - रविंद्र साळुंखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, उमेदवाराचे नाव चर्चेतील नाही. केवळ मराठा समाजातील उमेदवार म्हणूनच ओळख आहे.
पक्षीय बलाबल-
ठाणे लोकसभा मतदारसंघातील आमदारांचे संख्याबळ पाहता शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व आहे. ठाणे, मीरा भाईंदर आणि बेलापूर विधानसभा मतदार संघात भाजप तर कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा आणि ठाणे यामध्ये शिवसनेचे आमदार आहेत. मात्र, हे सर्व आमदार जवळपास मोदी लाटेच्या अनुषंगाने निवडून आल्याने यावेळी लाटेच्या आधारावर ही निवडणूक जिंकणे विचारेंना कठीण जाणार आहे. एवढ्या सगळ्या विधानसभा मतदारसंघात केवळ एरोली मतदार संघात राष्ट्रवादीला यश मिळवता आले आहे.
विधानसभा मंतदारसंघातील वर्चस्व-
- ऐरोली - संदीप नाईक (राष्ट्रवादी)
- बेलापूर - मंदा म्हात्रे (भाजप)
- ठाणे - संजय केळकर (भाजप)
- कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (शिवसेना)
- ओवळा-माजीवाडा - प्रताप सरनाईक (शिवसेना)
- मीरा भायंदर- जितेंद्र मेहता (भाजप)