महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jito Hospital Incident: बिला अभावी पार्थिव शरीर देण्यास नकार; महापालिकेच्या जितो हॉस्पिटलचा प्रताप - ठाणे महानगरपालिकेच्या

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयाचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असतानाच महापालिकेच्या आणखी एका रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. बिल भरले नाही म्हणून महापालिकेच्या एका माजी कर्मचाऱ्याचे पार्थिव शरीर तब्बल १२ तास कुटुंबीयास दिले नसल्याचे प्रकरण समोर आल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. जितो हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे.

Jito Hospital Incident
जितो रुग्णालय

By

Published : Aug 14, 2023, 9:50 PM IST

जितो हॉस्पिटल विषयी मृतांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया

ठाणे:महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील रुग्णांचे मृत्यू थांबलेले नसताना दुसरीकडे आणखी एका रुग्णालयाचा वाद समोर आला आहे. ठाण्यातील हजुरी भागात असलेले महावीर जैन अर्थात जितो रुग्णालय येथे बिल भरले नसल्याने एका रुग्णाचा मृतदेह तब्बल 12 तास त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली केला गेला नाही. महत्त्वाचे म्हणजे मृत झालेले अशोक बोबडे हे महापालिकेचे माजी कर्मचारी असून त्यांना शस्त्रक्रियेसाठी दखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली; परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

मनपा अधिकाऱ्यांनी घेतली सकारात्मक भूमिका:मृतकाच्या कुटुंबीयांनी 1 लाख 3 हजार रुपये अनामत रक्कम म्हणून जमा केली होती. शस्त्रक्रिया आणि औषधांच्या खर्चापोटी आणखी पैसे इस्पितळ प्रशासनाने भरायला सांगितल्यावर ते पैसे भरण्यास कुटुंबीयांनी असमर्थता दाखविली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने बोबडे यांचे पार्थिव शरीर देण्यास नकार दिला. तब्बल बारा तास वाट पाहिल्यावर कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्ता विनोद जाधव यांच्याशी संपर्क केला. त्यांनी थेट महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि सहआयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली. दोन्ही अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत सकारात्मक भूमिका घेत कुटुंबीयांना थकीत बिल न भरता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

रुग्णालय प्रशासनाला घेतले फैलावर:मयत अशोक बोबडे हे पालिकेचे माजी कर्मचारी असताना देखील त्यांचा मृतदेह देण्यास नकार दिला गेला. यामुळे सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या रुग्णालयात बिलासाठी नेहमीच तगादा लावला जातो, अशा अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने आपण आयुक्तांची भेट घेतली असता त्यांनी सकारात्मक भूमिका घेत आपल्याला मदत केली. यासाठी विनोद जाधव यांनी आयुक्त आणि सहआयुक्त संदीप माळवी यांचे आभार मानले.

याच रुग्णालयाला कॅन्सर हॉस्पिटलचे काम:ठाण्यातल्या याच महावीर जैन रुग्णालय आणि जितो संघटनेला कॅन्सर रुग्णालयाचे देखील काम मिळाले आहे. महावीर रुग्णालयातल्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वाढीव बिलाबद्दलच्या हजारो तक्रारी महापालिकेकडे मिळालेल्या आहेत. मात्र, तरीदेखील महापालिका यावर कोणताही अंकुश ठेवू शकलेली नाही. असे असताना याच रुग्णालयाला कॅन्सर रुग्णालयाचे ट्रीटमेंट आणि देखभालीचे काम मिळाले आहे. आता कॅन्सर रुग्णालयाचे काम जर हे लोक करत असतील तर ते सर्वसामान्य गरिबांना खरंच परवडेल का? असा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनामध्ये आहे. एकीकडे कळवा रुग्णालयाचा वाद सुरू आहे. अशात केवळ पैश्यांसाठी एका माजी महापालिका कर्मचाऱ्याचा मृतदेह तब्बल १२ तास अडकवून ठेवण्याचा प्रताप महापालिकेच्याच आशीर्वादाने चालणाऱ्या रुग्णालयाने करावा, यासारखे ठाणेकरांचे दुर्भाग्य नाही, असेच म्हणावे लागेल.

हेही वाचा:

  1. Kalwa Hospital Patient Death Case: कळवा हॉस्पिटलमध्ये मृत्यूचे थैमान; अश्रू.. हुंदके आणि टाहो
  2. Ambadas Danve on CM : कळवा रुग्णालयातील मृत्यूची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच; उद्धव ठाकरे असते तर...
  3. chhatrapati Shivaji Maharaj Hospital : मृत व्यक्तीवर आयसीयूत डॉक्टरांकडून 5 तास उपचार-जितेंद्र आव्हाड यांचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details