ठाणे : Raj Thackeray on Toll Rate : मागील ४ दिवसांपासून मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे टोल दरवाढी विरोधात आंदोलनास बसलेत. ठाण्यातील आनंदनगर टोलनाका या ठिकाणी मनसेचं हे आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनस्थळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. या संदर्भातील माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काय म्हणाले राज ठाकरे : मागील अनेक वर्षे टोलसंदर्भात मनसेनं आंदोलनं केली. अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास ६५ ते ६७ टोलनाके आम्ही बंद केलेत. 2014 आणि 2017 मध्ये शिवसेना-भाजपा जाहीरनाम्यामध्ये टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचे आश्वासन दिलं होतं. परंतु त्यांना टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं, हे कधीच विचारलं जात नाही. प्रत्येकवेळी टोलच्या आंदोलनाचं काय झालं, असा प्रश्न मला विचारल्या जातो. मात्र, त्याचे परिणाम अनेकांना दिसत नाहीत. तसंच टोल नाक्यावरून किती वाहनं जातात आणि किती टोल जमा होतो, त्या रकमेचं काय होतं, हा प्रश्न आहे. रस्ता कर तसंच टोलही भरावं लागत आणि इतर करही आपण भरतो. परंतु शहरांतील रस्त्यांवर खड्डे असतात आणि रस्ते नीट बांधले जात नाहीत. मग पैसे जातात कुठे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मला जनतेचं आश्चर्य वाटतं की निवडणुकीच्या काळात थापा मारतात, तुम्हाला पिळ पिळ पिळतात आणि तुम्हाला त्यांनाच मतदान करायचय. विरोधात मतदान झालेच नाही तर त्यांना समजणार कसं, असंही राज ठाकरे म्हणाले.