नवी मुंबई-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई गोवा महामार्ग तसेच राज्यातील रखडलेल्या रस्ते प्रकल्पांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला हिरवा कंदील दाखवताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, आंदोलन असे करा की सरकारला यापुढे निकृष्ट रस्ते करताना भीती वाटायला पाहिजे. पनवेल येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपासह महाविकास आघाडीवरदेखील हल्ला चढविला. मात्र चंद्रावर यान सोडण्यापेक्षा महाराष्ट्रात सोडले असते तर खर्च वाचला असता, असा टोलादेखील राज ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून केवळ खड्ड्यांचा राज्य आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये अडीच हजार लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. १६ हजार ६०० कोटी रुपये खर्च होऊन सुद्धा अद्याप हा रस्ता पूर्ण झालेला नाही. हा रस्ता 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मात्र, तोपर्यंत जनतेने त्रास का सहन करायचा असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पनवेल येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी केवळ मुंबई गोवा महामार्ग नाही तर राज्यातील सर्व रस्ते हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप आहे. रस्ते बांधणे हा राजकारण्यांचा धंदा आहे. त्याशिवाय त्यांना टक्के मिळत नाहीत. त्यांचे राजकारण चालत नाही असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. नुकतेच सरकारने चंद्रयान सोडले आहे.
या लोकांना धडा शिकवा- 2008 मध्ये मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू होऊनही रस्ता पूर्ण झालेला नाही. आतापर्यंत अनेक लोकांचा जीव गेला आहे. समृद्धी महामार्गावर सुद्धा ४५० दिवसांमध्ये ३५० लोक मृत्युमुखी पडले आहेत, असे असतानाही त्याच लोकांना पुन्हा निवडून दिले जात आहे. त्याच लोकांना पुन्हा मतदान कसे केले जाते हे मला आश्चर्य वाटते रस्ते वाहतूक व शाळा प्रवेशाबाबत नागरिकांना अडचणी येत असतानाही त्याच लोकांना निवडून दिले जात आहे. जर तुम्हाला हेच हवे असेल तर तुम्हाला हे सर्व लखलाभो. मात्र, हे बदल हवे असतील तर एकदा संधी द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले.