ठाणे -मागील संपूर्ण आठवडा आणि रुग्णाची संख्या ही मनात धडकी भरविणारी ठरत आहे. रुग्णसंख्येच्या वाढीसोबतच रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढला आहे. तर ठाण्यात रुग्णांना बेड अपुरे पडत आहेत. यासर्व गोष्टींमुळे आणि पालिकेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची केल्याने आपण कोरोनाचे शिकार झाले आहोत का, याची चाचपणी करण्यासाठी विविध चाचणी केंद्रावर पालिका आस्थापना आणि अत्यावश्यक सेवेचे कर्मचाऱ्यांनी गर्दी केलेली आहे. एवढेच नाही तर मास्क परिधान करून रांगेत उभे आहेत. वास्तविक रोज दीड हजारांपेक्षा जास्त असलेल्या रुग्णसंख्या पाहून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही धास्तावल्याचे चित्र दिसत आहे.
ठाणे पालिकेच्या विविध प्रभाग समितीत कोरोनाच्या चाचण्या सुरू होत्या. मात्र, ठाणेकर चाचणीकडे दुर्लक्ष करीत होते. कोरोना चाचणी केंद्रावर शुकशुकाट होता. मात्र, दुसऱ्या कोरोनाच्या लाटेची तीव्रता वाढल्यानंतर 500 च्या घरात असलेली रुग्णसंख्या आता दीड ते 2 हजारांवर आल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी धास्तावलेले आहेत. तर दुसरीकडे पालिका आस्थापनाने चाचण्या सक्तीच्या केल्याने आणि चाचणी निगेटिव्ह असेल तरच काम मिळेल, असे फर्मान काढल्याने चाचणी केंद्रावर गर्दी वाढलेली आहे. या आदेशाचे पडसाद गुरुवारी (दि. 8 एप्रिल) ठाण्यातील विविध कोरोना चाचण्या केंद्रावर मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसले. चाचणी सक्तीची केल्याने या रांगेत अस्थापना कर्मचारी यांच्यासह डिलिव्हरी बॉय, प्लंबर, घर काम करणारे, किराणा मालाच्या दुकानात काम करणारे यांचा समावेश आहे.
रुग्णसंख्या अन् मृत्यूचे प्रमाण वाढले