ठाणे -धाक, आदरयुक्त दरारा, समोरच्यांच्या उरात धडकी भरवणारी तीक्ष्ण नजर, अन्याय करणाऱ्याच्या पाठीवर आसूड ओढणारे ठाण्याचा वाघ अशी ख्याती असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर एक भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे याचं व्यक्तिमत्व ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते. त्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या “धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे” या चित्रपटाकडे लाखो शिवसैनिक डोळे लावून बसले आहेत. या चित्रपटाची निर्मिती सुरु झाली असून दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता मंगेश देसाई हा चित्रपट साकारणार आहेत. आनंद दिघेंच्या स्वत:च्या गाडीचा चित्रपटात वापर होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती देतानाच हा चित्रपट भव्य दिव्य तर होईलच पण धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य कदापि विसरता येणार नाही हे स्पष्ट केले.
तरूणांच्या गळ्यातील ताईत होते आनंद दिघे -
सत्तर ऐंशी दशकातील तो काळात मराठी माणूस बाळासाहेबांच्या विचाराने भारावला होता. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे शब्द मराठी मनात स्वाभिमानाचा अंगार चेतवत होते. अर्थात मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्यावरही त्याचे ठळक परिणाम दिसायला लागले होते. याच परिणामांनी ठाणे शहरावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. सतीश प्रधान शिवसेनेचे आणि ठाणे शहराचे पाहिले महापौर झाले. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. बाळासाहेबांच्या विचारांचे वेड लागलेला, सर्वसामान्य घरातील सामान्य अंगकाठीचा एक तरुण झंझावात पुढे येत होता. त्याने त्याचे सम्पूर्ण आयुष्य शिवसेना आणि बाळासाहेब यांच्यासाठी झोकून द्यायचे ठरविले होते. आपल्या काम करण्याच्या विशिष्ट शैलीने तो अल्पकाळातच तरुणांच्या गळ्यातील ताईत झाला. सर्वसामान्य शिवसैनिक, उपजिल्हाप्रमुख ते जिल्हाप्रमुख अशी काहीवेळातच त्याने झेप घेतली. साक्षात शिवरायांची काम करण्याची दरबारी पध्दत त्याने अनुसरली आणि बघता बघता आनंद दिघे हे नाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दुमदुमू लागले. दिघे यांची असलेली अध्यात्मिक बैठक आणि कट्टर हिंदुनिष्ठतेने त्यांना धर्मवीर ही पदवी आपसूकच चिकटली.