ठाणे - येथील कारागृहातून आरोपींना ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन आलेल्या ९ आरोपींपैकी दोघा आरोपींनी त्यांच्या नातेवाईकांनी घरुन आणलेले जेवण दिले नाही, म्हणून धक्काबुक्की केल्याचा प्रकार ठाणे कारागृहाच्या आवारात घडला. याप्रकरणी न्यायालयीन बंदी आरोपी महेंद्र जयप्रकाश सिंग आणि इम्रान हुसेन खान यांच्या विरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरच्या जेवणासाठी मनाई केली म्हणून आरोपींची पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की - अधिकाऱ्याला धक्काबुक्की
नातेवाईकांनी घरुन आणलेले जेवण दिले नाही म्हणून आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार ठाणे कारागृहाच्या आवारात घडला.
ठाणे कारागृहात बंदिस्त असलेले आरोपी महेंद्र जयप्रकाश सिंह, इम्रान खान यांसह अन्य मोक्काच्या ७ आरोपिंना पोलीस उपनिरीक्षक सुधीर इच्छाराम वाघ(५७) अन्य पोलीस कर्मचाऱयांसह जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन आले. तेव्हा आरोपी महेंद्र जयप्रकाश सिंग याने नातेवाईकांनी आणलेले घरचे जेवण देण्याची मागणी केली. मात्र पोलीस उपनिरीक्षक वाघ यांनी मज्जाव केला. यावरुन आरोपी सिंग आणि वाघ यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याची तक्रार वाघ यांनी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती बहलकर यांच्याकडे केली.
नंतर न्यायालयीन प्रक्रिया आटोपून पुन्हा आरोपिंना कारागृहात बंदी करण्यासाठी कैद्यांची पार्टी ठाणे मध्यवर्ती कारागृह येथील आवारात आली. तेव्हा आरोपी महेंद्र जयप्रकाश सिंग आणि इम्रान हुसेन खान यांनी पोलीस उपनिरीक्षक यांना जाब विचारला. आम्हाला घरचे जेवण का घेऊ दिले नाही म्हणून अधिकारी यांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांना अवार्च्य शिवीगाळ केली. याप्रकरणी रविवारी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.