ठाणे :मृतक मिनाक्षी ह्या भिवंडी-नाशिक मार्गावर भिवंडी तालुक्यात असलेल्या निंबवली गावात कुटुंबासह राहत होती. मृत महिला ९ महिने १ दिवसाची गरोदर होती. तिला मंगळवारी भिवंडी शहरातील टेमघर गावात असलेल्या स्वामी विवेकानंद अपार्टमेंटमधील स्वास्तिक क्रिटीकेयर हॉस्पिटल अँड आय.सी.यु. या खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर रात्री एक वाजल्याच्या सुमारास तिची प्रसुती करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती महिलेच्या नातेवाईकांनी व टेमघरमधील नागरिकांनी दिली. या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना व संबंधितांना मारहाण केली.
परवान्याअभावी रुग्णांवर उपचार :या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी महिलेच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, मृत महिलेच्या नातेवाईकांनी अद्याप संबंधित रुग्णालय आणि डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नसल्याने संताप व्यक्त केला आहे. परिसरातील सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की, स्वस्तिक क्रिटीकेयर हॉस्पिटल हे रुग्णालय गेल्या ३-४ वर्षांपासून सुरू असून ते डॉ. केतन खडके यांच्या मालकीचे आहे. त्यांनी अब्दुल रकीब शेख नावाच्या व्यक्तीस भाडे तत्त्वावर रुग्णालय चालविण्यास दिले आहे. तसेच अब्दुल रकीब शेख या व्यक्तीकडे डॉक्टरी व्यवसाय करण्याचा कोणताही परवाना नसताना तो रुग्णांवर उपचार करीत असल्याचे सांगण्यात आले.