महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडी लोकसभेसाठी उद्या मतदान, मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची घेतली जाणार मदत - ड्रोन कॅमेरा

भिवंडी लोकसभेसाठी उद्या मतदान असून मतदान केंद्राध्यक्ष मतदान पेट्या घेऊन पोलीस बंदोबस्तात केंद्रावर रवाना झाले आहेत.

निवडणूक कर्मचारी मतदान पेट्या घेऊन जात असताना

By

Published : Apr 28, 2019, 6:27 PM IST

ठाणे - भिवंडी लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होत आहे. त्यामुळे निवडणूक प्रशासनासह पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यावर्षी पहिल्यांदाच मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

निवडणूक कर्मचारी मतदान पेट्या घेऊन जात असताना

निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे, सहनिवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी आज ६ निवडणूक विभागीय अधिकारी आणि केंद्राध्यक्षासह अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. यावेळी निवडणूक मतदान कामासाठी सर्व अधिकाऱ्यांना सूचना देत त्यांच्याकडे मतपेट्या सुपुर्द केल्या. या मतदान पेट्या घेऊन निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी पोलीस बंदोबस्तासह मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण २,२०० मतदान केंद्र असून त्यासाठी एकूण १३ हजार कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्ती केले आहेत. आज २ हजार १९८ कर्मचारी निवडणूक केंद्रावर ७३५ वाहनांसह रवाना झाले आहेत. तर निवडणूक आयोगाने प्रथमच भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण (प) मुरबाड, शहापूर, भिवंडी ग्रामीण अशा ६ विधानसभा क्षेत्रात १२ सखी मतदान केंद्र तयार केली आहेत. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांसह महिला पोलीस काम पाहतील. मतदान केंद्रावर पाळणा घर आणि मतदान सहाय्य कक्ष उभारण्यात आले आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात १८ लाख ८९ हजार ४४३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाचा दिवशी अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्र आणि नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार आहे. तसेच राज्य राखीव पोलीस दलासह विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ६ विधानसभा मतदार संघातील १,३५१ शासकीय इमारतीत २,१८९ मतदान केंद्र निर्माण केली आहेत. या केंद्रावर २,१८९ केंद्राध्यक्ष आणि ६५६७ मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर मतदानासाठी मतदान यंत्र २१८९ (बियु- बॅलेट पेपर युनिट ) आणि २१८९ (सीयु- कंट्रोल युनिट ) आहेत.

निवडणुकीच्या कामकाजासाठी १३ हजार २०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर निवडणूक बदोबस्तासाठी विशेष ३ पोलीस उपायुक्त, ५ सहाय्यक पोलीस आयुक्त, ५३ पोलीस निरीक्षक, १६० सहायक पोलीस निरीक्षक, २१२० पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड, आणि एसआरपीएफच्या ३ कंपन्या क्यूआरटी तसेच प्रत्येक मतदान केंद्रांवर ४ पोलीस आणि १ होमगार्ड याप्रमाणे १ हजार ४७४ पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. भिवंडी लोकसभा क्षेत्रात एकूण १६५ संवेदनशील मतदान केंद्र असून त्याठिकाणी विशेष दक्षता घेतली जाणार असल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details