ठाणे - कल्याण ग्रामीण परिसरातील आडीवली गावात घातक रासायन भेसळ करून बनावट डिझेल तयार करणाऱ्या गोदामावर कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारली. यात ३० लाखांच्यावर बनावट डिझेलचा साठा गोदामातून जप्त केला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या तक्रारीवरून डिझेल भेसळखोरांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून आतापर्यत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पवन यादव (वय, २६), कृष्ण शुक्ला (वय, २८), रोहन शेलार (वय, ३४), पंकज राजकुमार सिंग (वय, २७), विपुल वाघमारे (वय, २८), संदेश राणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
बिन भोबाट सुरू होता बनावट डिझेल तयार करण्याचा गोरखधंदा
कल्याण ग्रामीणमधील आडीवली ढोकळी परिसरात एका गोदामात बनावट डिझेल तयार करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर बुधवारी दुपारच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गोदामात घातक ज्वालाग्राही रसायनच्या सहाय्याने बनावट डिझेल तयार करताना भेसळबाजांच्या टोळीला रंगेहात ताब्यात घेतले.