ठाणे- बहुचर्चित कल्याणच्या पत्रीपुलाचा ७०० मेट्रिक टन वजनाचा गर्डर लॉंच करण्यासाठी रेल्वेकडून काल आणि आज घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे दररोज डोंबिवलीहून कल्याण व त्यापुढे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. रेल्वेच्या फेऱ्या रद्द केल्या असल्याने प्रवाशांचे हाल झाले. पर्यायी सोय म्हणून कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या बस गाड्यांसह एस. टी बसेसही सोडण्यात आल्या होत्या. मात्र, त्या बस आणि एसटीमध्ये प्रवासी खच्चून भरल्यामुळे सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला. अनेकांनी रिक्षा प्रवासाचा पर्याय स्वीकारल्याने रिक्षाचालकांनी अव्वाच्यासव्वा भाडे आकारणी केली.
'मेगाब्लॉक'मुळे बसेसमध्ये प्रवाशांची दाटी; सुरक्षित अंतराचे तीनतेरा
रेल्वेच्या फेऱ्या रद्द केल्या असल्याने प्रवाशांचे हाल झाले. पर्यायी सोय म्हणून कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या बस गाड्यांसह एस. टी बसेसही सोडण्यात आल्या होत्या. मात्र, त्या बस आणि एसटीमध्ये प्रवासी खच्चून भरल्यामुळे सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला. अनेकांनी रिक्षा प्रवासाचा पर्याय स्वीकारल्याने रिक्षाचालकांनी अव्वाच्यासव्वा भाडे आकारणी केली.
पत्रीपुलाचे काम दोन वर्षांपासून रखडत सुरू होते, आता हे काम अंतिम टप्प्यात येऊन मार्गी लागत असल्याचे समाधान असताना या कामाकरिता शनिवारी व रविवारी घेतलेल्या चार तासांच्या 'मेगाब्लॉक'ने डोंबिवली ते कल्याण व त्यापुढे कर्जत-कसारा मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. मात्र, रेल्वेने ठरवून दिलेल्या वेळेत आज १०० टक्के कामपूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, उद्यान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मेगाब्लॉक उशिरा घ्यावा लागला. त्यामुळे आज ९० टक्केच काम पूर्ण झाल्याने १० टक्के काम अपूर्णच राहिले आहे. त्यातच काम सुरू करण्यापूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिका व रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या कामाकरिताच घराबाहेर पडा, असे आवाहन पोलीस व रेल्वे प्रशासनाने केले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पत्रीपूल मेगाब्लॉक त्रासदायक ठरला. मेगाब्लॉकमुळे रेल्वेने २५० फेऱ्या रद्द केल्या होत्या. सकाळी १० ते २ वाजेपर्यंत चार तासांचा मेगाब्लॉक असल्याचे रेल्वेने जाहीर केले होते. लाकल रद्द केल्याने बस व रिक्षासह खाजगी टॅक्सीचा आधार घेत इच्छित स्थळ गाठावे लागले.
केडीएमटीला लाखाचे उत्पन्न
कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून दररोज ५५ ते ६० बसगाड्या चालविल्या जातात. मात्र शनिवारी, रविवारी मेगाब्लॉकसाठी परिवहन उपक्रमाने २५ जादा बसची व्यवस्था केली होती. कल्याण-डोंबिवलीदरम्यान २५, कल्याण-टिटवाळादरम्यान ४०, कल्याण-बदलापूर २०, विठ्ठलवाडी-डोंबिवलीदरम्यान १० अशा एकूण दरदिवशी ९५ फेऱ्या ठेवण्यात आल्या. त्यातूनच दोन दिवसात दोन ते अडीज लाख रुपयांचे उत्पन्न केडीएमटीला मिळणार असल्याचे सांगण्यात आले.