ठाणे- डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकर सुरु होणार आहे. या पुलाची दुरुस्ती लवकरात-लवकर होणे काळाची गरज आहे. त्याबरोबरच नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी यंत्रणा सज्ज आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. संयम आणि शिस्त बाळगल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, असे वक्तव्य डोंबिवलीचे आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील रेती बंदर रोडवरील अमोघ सिद्ध सभागृहात मतदार नोंदणी जनजागृती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रविंद्र चव्हाण बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, कोपर रेल्वे पूल दुरुस्तीची गरज आहे. दुरुस्तीचे काम सुरु झाल्यास पर्यायी मार्ग आहेत. डोंबिवलीकरांनी संयम आणि शिस्तीचे पालन केल्यास अडचण येणार नाही. मात्र, अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्व यंत्रणा आपल्या मदतीसाठी सज्ज आहेत.