ठाणे- कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरु आहे. रविवारी पुन्हा या महामार्गावरील पोटगाव नजीक दुचाकी आणि चारचाकी वाहनांत जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
हेही वाचा - ठाण्यात राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध, जाळला प्रतिकात्मक पुतळा
सुजित लालासाहेब यादव (वय - 23 रा, डोंबिवली ) असे जागीच मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर भावेश हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून चारचाकी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुर्गेश चौधरी (डोंबिवली, रा. 23 ) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चारचाकी चालकाचे नाव आहे.
कल्याण-मुरबाड महामार्गावरून मृत सुजित आणि जखमी भावेश हे दोघे दुचाकीने रविवारी साडे आकाराच्या सुमाराला जात होते. त्यावेळी पोटगाव नजीक रस्त्यावर याच सुमाराला भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात सुजितचा जागीच मृत्यू झाला तर भावेश गंभीर जखमी झाला आहे. कल्याण - मुरबाड मार्गावरील पोटगाव दरम्यान आठडयाभरात 4 जणांचे अपघात बळी गेले आहेत. शिवाय गेल्या ५ वर्षात कल्याण मुरबाड या महामार्गावर आत्तापर्यंत शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
हेही वाचा - रुग्णवाहिका नसल्याने तडफडणाऱ्या जखमीला नेले लोकलमधून
या महामार्गाचे रुंदीकरण करणे अत्यंत गरजेचे असताना देखील शासन नको तिथे रस्ते रुंदीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे लाखो रुपयांचा निधी खर्च करुन तयार केलेले रस्ते एका वर्षात तोडून ते पुन्हा रस्तारुंदीकरणाच्या नावाने उभारले जात असल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला.