ठाणे - मान्सूनपूर्वीच्या वादळी वाऱ्यात अंगावर पत्रे पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या वाऱ्यामध्ये ७ घरांचे मोठे नुकसान झाल्याने सातही कुटुंब उघड्यावर आली आहेत. ही घटना भिवंडी तालुक्यातील किरवली (आमणे) गावात घडली. कैलाश गोविंद बजागे (वय ३५ ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मान्सूनपूर्वीच्या वादळ वाऱ्यात अंगावर पत्रे पडून एकाचा मृत्यू - अंगावर पत्रे पडून एकाचा मृत्यू
मान्सूनपूर्वीच्या वादळी वाऱ्यात अंगावर पत्रे पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या वाऱ्यामध्ये ७ घरांचे मोठे नुकसान झाल्याने सातही कुटुंब उघड्यावर आली आहेत.
जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात गेल्या 4 दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. शिवाय यासोबतच वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील अनेक घरांचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाईची मागणी होत आहे. काल सायंकाळच्या सुमाराला भिवंडी तालुक्यातील किरवली (आमणे) गावात अचानक अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा तडाका बसला होता. वादळी वारा एवढा जोरात होता की, घरांचे पत्रे ४० ते ५० फूट उंच हवेत उडून ५० फूट अंतरावर उभे असलेल्या कैलाश गोविंद बजागे याच्या अंगावर पडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना गावकऱ्यांनी तातडीने उपचारासाठी कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान कैलाशचा मृत्यू झाला. मृत कैलाश हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरर्निवाह करत होता. त्याच्या कुटुंबात वयोवृद्ध आई, पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे.
वादळी वाऱ्यामुळे गावातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ७ कुटुंब उघड्यावर आली आहेत. तर २ दुचाक्या व १ चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच नांदकरचे तलाठी यांनी नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे केले असून, यामध्ये लाखोंचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त गावकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाईची मागणी भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे केली आहे.