ठाणे- माळशेज घाटातील सावर्णे गावाजवळ लाकडाने भरलेल्या भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत भरधाव ट्रक रस्त्यावरच पलटी झाल्याने ट्रकमधील लाकडे कारवर कोसळून संपुर्ण कारचा चेंदामेंदा होऊन कारमधील १ जण ठार तर २ गंभीर जखमी झाले आहेत. अजय घुडे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
माळशेज घाटात ट्रक आणि कारचा भीषण अपघात; १ ठार तर २ गंभीर - truck
अजय घुडे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव
कल्याण- मुरबाड- माळशेज महामार्गावर अपघातांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना बुधवारी सायंकाळी पुन्हा ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या घटनेत मुरबाड तालुक्यातील सरळगाव उंबरपाडा येथील अजय घुडे व अन्य दोन जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी घेवून जात असतानाच अजय घुडे या तरुणाचा रस्त्यातच मृत्यू झाला. तर अन्य दोन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. अजयच्या मृत्युने घुडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर या घटनेमुळे मुरबाड तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.