महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीच्या तोंडावर रक्तपात घडविण्याचा मनसुबा उधळला; उत्तर भारतीय गुंड कट्ट्यासह जेरबंद - police

मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील हा गुंड डोंबिवलीजवळच्या आजदे पाड्यातील अजय स्मृती इमारतीत सद्या चोरी-छुपे राहत असल्याची माहिती त्याने पोलिसांजवळ दिली.

उत्तर भारतीय गुंड कट्ट्यासह जेरबंद

By

Published : Apr 15, 2019, 1:33 PM IST

ठाणे- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतून अनेक गुंड-गुन्हेगारांना मुसक्या बांधून गजाआड केले असतानाच पोलिसांच्या हाती एक उत्तर भारतीय गुंड हाती लागला आहे. या गुंडाकडून जिवंत काडतुसांसह गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यात आले आहे.


राम गुलकंद कनोजिया (३६) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव असून कल्याण न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहराच्या पूर्वेकडील नेहरू रोडला असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ एक इसम अग्निशस्त्रांसह येणार असल्याची खबर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंग पवार यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक नारायण जाधव, फौजदार मोहन कळमकर, राजेन्द्र जाधव, सचिन वानखेडे, चंद्रकात शिंदे, प्रशांत वानखेडे या पथकाने शनिवारी दुपारपासून सदर ठिकाणी फिल्डिंग लावली होती. तासाभराच्या प्रतीक्षेनंतर खबऱ्याने दिलेल्या वर्णनाचा तरूण दबकत दबकत तेथे आला. मात्र, पोलिसांनी परिसरात फिल्डींग लावल्याची कुणकुण लागताच त्याने तेथून धूम ठोकली. तथापी पोलिसांच्या या पथकाने थरारक पाठलाग करून फर्लांगभर अंतरावर त्याच्या मुसक्या आवळल्या.

त्याच्या झाडाझडतीदरम्यान त्याच्याकडे २५ हजार रूपये किंमतीचे रिव्हॉल्व्हर व २ जिवंत राऊंड (काडतुसे) हस्तगत करण्यात आली. मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील हा गुंड डोंबिवलीजवळच्या आजदे पाड्यातील अजय स्मृती इमारतीत सद्या चोरी-छुपे राहत असल्याची माहिती त्याने पोलिसांजवळ दिली. अटक केलेला हा गुंड अग्निशस्त्र तस्कर असावा, असा पोलिसांचा कयास आहे. हस्तगत केलेले लोडेड रिव्हॉल्व्हर त्याने कोठून आणले ? या त्याचा वापर करण्याचा त्याचा इरादा काय ? हे शस्त्र कुणाला विक्री करायचे होते का ? या पूर्वी अशी किती शस्त्रे त्याने उत्तरभारतातून आणून कल्याण-डोंबिवली वा अन्य परिसरात विकली ? त्याच्या विरोधात तसे गुन्हे दाखल आहेत का ? याचा पोलिस मागोवा घेत असून त्यातून अग्नीशस्त्र तस्करांची मोठी टोळी हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details