ठाणे -उसनवारीने दिलेले १ लाख रुपये मागण्यासाठी ब्युटीपार्लरची ( Beauty Parlor Owner Murder ) मालकीण घरी गेली असता वाद होऊन माय-लेकानी मिळून तिच्यावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका ( Chakkinaka Area Murder ) परिसरात असलेल्या शास्त्रीनगरमधील चाळीत घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात माय-लेकावर हत्येचा गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. विजय अनंतलाल राजभर, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लालसादेवी राजभर ही फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहे. तर रंजना राजेश जैसवार (३९) असे निर्घृण हत्या झालेल्या ब्युटीपार्लरच्या मालकीनीचे नाव आहे.
पैसे देण्यास टाळाटाळ -मृतक रंजना हीचे आरोपीचा भाऊ अजय राजभर याच्या सोबत मैत्रिचे संबंध होते. तसेच मृतक रंजना हीने अजयला १ लाख रुपये उसनवार दिलेले होते. त्यामुळे मृत रंजना ही अजयकडे उसनवार दिलेले पैसे मागिण्याकरिता तगादा लावत होती. मात्र, अजय हा पैसे देण्यास टाळाटाळ करत होता, त्यामुळे मृतक रंजना ही अजयच्या घरी शुक्रवारी रात्री १० वाजल्याच्या सुमारास जावून उसनवार दिलेल्या पैश्यांची मागणी करत असतना वाद झाला होता. त्यानंतर आरोपी विजय आणि त्याची आई लालसादेवी यांनी आपसात संगनमत करून रंजना जैसवार हिच्या पोटावर, पाठीवर, छातीवर गळयावर तसेच डावेबाजूचे काखेत चाकुने वार करून तिची निर्घृण हत्या केली.