ठाणे -आपल्या विधवा मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबधाच्या संशयातून भर चौकात ६७ वर्षाच्या वडिलांनी एका २६ वर्षीय तरुणाची धारदार चाकूने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बदलापूर पूर्वेकडील सुरवळ चौकात घडली. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करून वयोवृद्ध आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
विधवा मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणाचा खून सचिन शिंदे (वय, २६), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बदलापूर पूर्व परिसरातील सुरवळ चौकात आरोपी कुटुंबासह राहतो. तीन वर्षांपूर्वी आरोपीच्या जावयाचे निधन झाले होते. त्यामुळे मुलगी त्यांच्याकडेच राहत आहे. या दरम्यान सचिनसोबत तिची ओळख झाली होती. या ओळखीतून ते फेसबुकवर बोलत होते. काही दिवसांपूर्वीच आरोपीने मुलीला सचिनसोबत बोलताना पहिले होते. यामुळे मुलीला तिच्या वडिलांनी विरोधही केला असल्याची माहिती समोर आली आहे.
सचिन हा आरोपीच्या मुलीला वारंवार त्रास देत होता. त्यामुळे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हे प्रकरण यापूर्वीच गेले होते. मात्र, तरीदेखील सचिन आरोपीच्या मुलीला त्रास देत होता. अखेर मलीच्या वडिलांना सचिन आणि मुलीच्या प्रेमसंबधाचा संशय निर्माण झाला. त्यातच बुधवारी दुपारच्या सुमारास बदलापुरातील सुरवळ चौकात सचिन आल्याची माहिती मिळताच आरोपीने तीक्ष्ण हत्याराने वार करून सचिनचा खून केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर सचिनचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसात उल्हासनगर आणि बदलापूर या शहरात सलग दोन हत्या झाल्याने बदलापूर शहर हादरले आहे.