ठाणे - टँकरच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना कल्याण - बदलापूर मार्गावरील उल्हासनगर शहरातील अनील अशोक चित्रपटगृहासमोर घडली. सुनिल पवार (40) असे टँकरच्या धडकेत जागीच ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते उल्हासनगर परिसरातील भीम कॉलनी येथे कुटुंबासह राहत होते.
टँकरच्या धडकेत 40 वर्षीय पादचाऱ्याचा जागीच मृत्यू
कल्याण बदलापूर मार्गावरील उल्हासनगर शहरातील अशोक चित्रपटगृहासमोर रस्ता ओलांडत असताना एका पादचाऱ्याचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मृत सुनील हे शुक्रवारी दुपारच्या सुमारास आपल्या बहिणीकडून घरी येत होते. दरम्यान, अशोक टॉकीजवळ असलेल्या गुरुगोविंद शाळेसमोरील रस्ता ओलांडताना त्याच रस्त्यावरुन भरधाव येणाऱ्या ऑईलने भरलेल्या टँकरने सुनिल यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सुनील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकर चालकाला ताब्यात घेतले. सध्या सुनीलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरमधील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.