ठाणे -गणपती बाप्पाच्या विसर्जनास जाताना चारचाकी आणि रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात उल्हासनगरातील चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना 13 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. मृतांमध्ये रिक्षाचालक व वलेचा कुटुंबातील तीन जणांचा समावेश होता. गुरुवारी (दि. 16 सप्टेंबर) वलेचा कुटूंबातील चिमुकलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. लहर वलेचा, असे तिचे नाव असून या अपघातातील मृतांची संख्या पाच झाली आहे.
वर्षा वलेचा (वय 51 वर्षे), आरती वलेचा (वय 41 वर्षे), राज वलेचा (वय 12 वर्षे), लहर वलेचा (सर्व रा. कॅम्प क्रं. पाच) व रिक्षा चालक किशन विठ्ठल शिंदे, अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, 13 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास वलेचा कुटुंबतील चौघे किशन शिंदे यांच्या रिक्षाने पालेगाव नवीन एमआयडीसीच्या मार्गाने अंधारात काकोडे भागातील गणेश घाटावर विसर्जनासाठी जात होते. तेव्हा भरधाव चारचाकी व रिक्षाचा भीषण अपघात झाला. त्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर लहर व चारचाकीचा चालक जखमी झाले होते. लहर हीचा आज (गुरुवार) उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -मेकॅनिकल इंजिनिअरची हत्या, चौघे आरोपी गजाआड