ठाणे - शहापूरपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या खरीवली गावात जाणारा एकमेव मुख्य रस्ता असून तो कच्चा रस्ता असल्याने बाराही महिने त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य असते. त्यामुळे वाहनामुळे एकाद्याच्या अंगावर चिखल उडल्यास वादावादी होते. म्हणून ग्रामस्थांनी न्यायालयीन लढा उभारण्याची तयारी सुरू केली आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावर साचलेले असते व इतर वेळी भातसा कॅनलचे पाणी साचते यामुळे बाराही महिने हा रस्ता चिखलमयच असतो.
गावात जाण्यासाठी स्वातंत्र्यापासून रस्ताच नाही
एकीकडे शहापूर तालुक्यातील गाव, खेड्या-पाड्यात अतिदुर्गम भागात बहुतांश रस्ते चकाचक झाले आहेत. मात्र, शहापूरपासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या खरीवली गावातील नागरिकांना गावात जाण्यासाठी स्वातंत्र्य काळापासून रस्ताच नसल्याने पंचायत होऊन बसली आहे. 70 घरांचे खरीवली गाव असून 350 च्या सुमारास लोकसंख्या आहे. या गावात कुणबी, आदिवासी, बौद्ध, वारली समाजाचे बांधव राहत आहेत. मात्र, गावात जाण्यासाठी नागरिक ज्या रस्त्याचा वापर करत आहेत. ती जागा एका खासगी मालकी हक्काची असल्याने गावातील स्थानिक राजकारणामुळे तिसऱ्या पिढीपासून जागा मालकाने पूर्ण गावाला वेठीस धरले असून हा मालक गावात जाणारा रस्ताच करून देत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
जागा मालकाच्या कुटुंबातील सदस्याला उपसरपंचही केले, मात्र सतत घूमजाव
खरीवली गावातील नागरिकांना गावात जाण्यासाठी रस्ता व्हावा म्हणून वर्षांपासून अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी जागा मालकाशी बैठक घेऊन रस्ता व्हावा यासाठीही वारंवार प्रयत्न केले आहेत. विशेष म्हणजे जागा मालकाच्या अटीशर्यती ही मान्य केल्या आहेत. एक वेळ तर जागा मालकाच्या कुटुंबातील सदस्याला उपसरपंचही केले होते. तर स्वतःच्या फायद्यसाठी जागा मालकाने रस्ता देण्यासाठी अनेक वेळ गावकऱ्यासह लोकप्रतिनिधींना होकारही दिला. पण, बैठक संपताच घूमजाव करत जागा मालक रस्ताला नकार देत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.