ठाणे- लॉकडाऊन व संचारबंदीमुळे असंख्य लग्न सोहळे अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित पार पाडल्याचे दिसून येत आहे. लग्न सोहळ्यातील उरलेल्या रक्कमेतुन संसारची सुरुवात करणाऱ्या वधु-वरांनी भुकेल्याची भूक भागवली तर काहींनी मुख्यमंत्री सहायता निधीस देणगी स्वरूपात मदत केली. अशीच मदत भिवंडी तालुक्यातील वधू-वरांनी केलीय. लग्न सोहळा संपन्न होताच त्यांनी भिवंडी तहसीलदार कार्यालय गाठून मुख्यमंत्री सहायता निधीत पन्नास हजारांची देणगी दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आल्याने भव्य विवाह सोहळे साजरे करण्यास मनाई आहे. अशा गंभीर परिस्थितीत भव्यदिव्यतेला पूर्णविराम देत भिवंडी तालुक्यातील वैजाळा या गावातील देवा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे संघटक रवींद्र बिभीषण पाटील यांनी शहापूर तालुक्यातील कांबारे येथील प्रियांका बाळू विशे हिच्या घरी अत्यंत साधेपणाने विवाह केला. यानंतर आपल्या घरी न जाता वधू-वरांनी थेट भिवंडी तहसीलदार कार्यालय गाठले तेथे भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 50 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा काम केले आहे. माजी आमदार रुपेश म्हात्रे ,देवा ग्रुपचे तानाजी मोरे, सोनाळे ग्रामपंचायतींचे सरपंच विशुभाऊ म्हात्रे उपस्थित होते .