नवी मुंबई-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची अवाजवी रक्कम आकारत लुबाडणूक करणाऱ्या 10 खासगी रुग्णालयांवर नवी मुंबई आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. संबधित 10 रुग्णालयांना याबाबत नोटीस बजावण्यात आलेली आहे.
अवाजवी बिल आकारणी करणाऱ्या 10 रुग्णालयांवर नवी मुंबई मनपाचा कारवाईचा बडगा - 10 खासगी रुग्णालयांना नोटीस
कोरोना संकटाच्या काळात अवास्तव बिल आकारणी करणाऱ्या 10 रुग्णालयांवर नवी मुंबई मनपा कडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी याबाबत खासगी रुग्णालयांना नोटीस पाठवली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील काही खासगी रुग्णालयांकडून आकारलेल्या बिलांमध्ये प्रथमदर्शनी विसंगती आढळली. बिलांमध्ये विसंगती आढळलेल्या 10 रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बजावत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तसेच, यापुढेही कोणी नियमापेक्षा जास्त बिल आकारल्यास महापालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.
कोरोना रुग्णांवर त्यांच्या लक्षणांच्या अनुरुप योग्य प्रकारे उपचार केले जावेत. त्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून शासन अधिसूचनेनुसार प्रत्येक बाबीसाठी निश्चित केलेले वाजवी शुल्क आकारले जावे याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. वैद्यकीय उपचार सुविधा व देयक यावर मार्गदर्शक सूचना दिल्या असून रुग्णालय निहाय नियुक्त केलेल्या महापालिकेच्या नोडल अधिकारी यांनी त्याबाबतच्या अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आदेश आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.