ठाणे- दुचाकी चोरल्याच्या संशयातून एका नेपाळी तरुणाचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गाव परिसरात घडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात १० ते १२ जणांच्या टोळक्याविरोधात अपहरण करून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेपाळी तरुणाची ठाण्यात हत्या; १० ते १२ जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल - Nepali youth murdered thane
अज्ञात आरोपींनी काल रात्रीच्या सुमारास राजू व भरत या दोघांना जबरदस्तीने एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून नांदवली गावाच्या दिशेने नेले. राजू धापा याला नांदिवली चौकात उतरवून भरतला नेवाळीच्या दिशेने नेण्यात आले. पुढे भरतला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली.
भरत परिहार, असे हत्या झालेल्या नेपाळी तरुणाचे नाव आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ तालुक्यातील चिंचपाडा परिसरात मंगलमूर्ती हॉस्पिटलजवळ साई पूजा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये रोशन थापा, त्याचा भाऊ राजू थापा व त्याचा गावाकडील मित्र भरत परिहार हे तिघे काम करतात. भरतने नेवाळी परिसरातून एक दुचाकी चोरी केल्याच्या संशयावरून १० ते १२ तरुणांनी काल रात्रीच्या सुमारास पूजा हॉटेलमध्ये घुसून लाकडी दांडके व ठोशाबुक्यांनी सदर तिघांना बेदम मारहाण केली. त्यानंतर राजू व भरत या दोघांना जबरदस्तीने एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून नांदिवली गावच्या दिशेने नेले. राजू धापा याला नांदिवली चौकात उतरवून भरतला नेवाळीच्या दिशेने नेण्यात आले. पुढे भरतला आणखी बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली.
हत्येनंतर भरतचा मृतदेह नेवाळी-मांगरूळ रोडच्या कडेला फेकून देण्यात आला. या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतक भरतचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यास शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी राजू रमेश थापा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दहा ते बारा अनोखळी व्यक्तींच्या टोळक्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे करीत आहेत.