नवी मुंबई-नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पक्षाने तयारी सुरु केली तर यश आपल्या हातात येणार याबाबत मनात शंका नाही. आपण एकत्रपणे या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करुयात आणि यासाठीच्या तयारीला लागूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयातील आढावा बैठक नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत नवी मुंबईत कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आली पाहिजे, यासाठी नियोजनपूर्वक कामांना सुरुवात करावी लागेल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-पार्थ पवार हे नाराज नाहीत, ते पक्ष सोडणार नाहीत- जयंत पाटील
वादळे येतात आणि जातात आपण सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षच उरणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र, शरद पवारसाहेब लढ्यात उतरले आणि महाविकास आघाडीच्या रुपाने महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद व नवी मुंबई प्रभारी आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस नसीम सिद्दीकी, ठाण्याचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.